सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (21:11 IST)

खवय्यांना ताजे फडफडीत मासे पुन्हा खाता येणार ; कोकणात आजपासून मासेमारी हंगाम सुरू

आजपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात झाली आहे.  याच पार्श्वभूमीवर किनाऱ्यांवर मच्छीमारांची लगबग सुरू असून मच्छिमार नव्या उत्साहात दर्यावर स्वार झाले आहेत. समुद्री वातावरण, वारे आणि पाऊस यांचा अंदाज घेऊन दर्याला श्रीफळ अर्पण करून अनेक मच्छिमार मासेमारीला सुरुवात करतात.
 
पावसाळ्यात समुद्राला असलेलं उधाण, माशांच्या प्रजननाचा काळ या कारणास्तव जून आणि जुलै या कालावधीमध्ये मासेमारी बंद असते. शासकीय नियमानुसार देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात लागू असलेला दोन महिन्यांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी काल 31 जुलै रोजी संपला असून आज पासून मासेमारी हंगामास सुरू झाला आहे.  1 जून ते 31 जुलै असा 61 दिवसांचा बंदी कालावधी मागील काही वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आला आहे.
 
मुंबई, अलिबाग, डहाणू, वसई, उरण, नाव्हा शेवा, हर्णे, जयगड, रत्नागिरी, देवगड, मालवण, वेंगुर्ले यासारख्या राज्याच्या किनारपट्टीवरील लहान मोठ्या सुमारे 50 बंदरात मासेमारीची प्रत्यक्ष उलाढाल असते. राज्यात लाखाहून अधिक कुटुंब मासेमारीवर अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. शिवाय परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणात खलाशी या ठिकाणी दाखल होत असतात.
 
महाराष्ट्रातून वर्षाकाठी चार ते पाच लाख हजार मॅट्रिक टन इतकी मासेमारी होत असते. परराज्यातील अनधिकृत पर्ससीन, एलईडी व हायस्पीड ट्रॉलर्सच्या मासेमारी विरोधातील नव्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तरच अशा विध्वंसक मासेमारीला आळा बसणार असल्याचे म्हटले जाते.
 
स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन होऊन पुरेसा कर्मचारी, अधिकारी आणि अद्ययावत गस्तीनौका मिळाव्यात अशी आमची मागणी आहे असे पारंपरिक मच्छीमार यांनी सांगितले. मासेमारीतील ज्या गोष्टी शासन नियमानुसार बेकायदेशीर ठरविल्या गेल्या आहेत. त्या रोखणे हे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य आहे. राज्यातील सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना जगवायचे असेल, तर शासनाने पारंपरिक मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार एलईडी व अनधिकृत पर्ससीन मासेमारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीदेखील मच्छिमारांनी केली.
 
दरम्यान पावसाळा सुरू होत असताना माशांचा दर वाढलेले असतात. तर, पावसाळ्यात मासेमारीला बंदी असल्याने माशांचा दर वाढलेला असतो. आता, मासेमारी हंगाम सुरू होत असताना श्रावण महिना सुरू झाला आहे. यंदा अधिक श्रावण मास असल्याने माशांच्या दरावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor