'लाडकी सुनबाई योजना' नक्की काय? उपमुख्यमंत्री काय म्हणाले जाणून घ्या
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संशयित अर्जदारांची यादी तयार केली आहे आणि चौकशीनंतर जर ते अपात्र आढळले तर लाभ थांबवले जातील. आतापर्यंत २.२५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना १३ हप्त्यांमध्ये एकूण १९,५०० रुपये मिळाले आहेत.
महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'माझी लाडकी बहीण योजना' ने लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केले आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात या योजनेने मोठी भूमिका बजावली असे मानले जाते.
काय आहे लाडकी सून योजना?
राज्य सरकारच्या वतीने शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून लाडकी सूनबाई योजना घरोघरी पोहोचणार ज्याचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. लाडकी सूनबाई या योजनेसाठी प्रत्येक शिवसेने शाखेमध्ये किंवा जे काही शिवसेनेचे विभागीय कार्यालय असेल या ठिकाणावरून त्यांना मदत केली जाणार आहे, यासाठी एक हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून लाडक्या सुनेवर होत असलेले अन्याय किंवा अत्याचार यावर मदत केली जाणार आहे.
ठाण्यात याचा शुभारंभ करत शिंदे म्हणाले की जशी आपली मुलगी लाडकी असते त्याचप्रमाणे सून ही लाडकी व्हावी, यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरु केली आहे. ते म्हणाले की सूना देखील माझ्या लाडक्या बहिणी आहेत, मी त्यांचा भाऊ आहे. कुणीही अत्याचार किंवा अन्याय करत असेल तर गाठ शिवसेनेशी आहे.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान राज्यात आर्थिक दृष्ट्या लाडकी सुनाबई योजना सुरु होण्याची चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सध्या असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हा तो प्रथम मंत्रिमंडळात मंजूर केला जाईल आणि नंतर संपूर्ण महाराष्ट्राला माध्यमांद्वारे कळवले जाईल. अजित पवार यांनी असेही म्हटले की, सरकार जनतेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यास नेहमीच तयार आहे, परंतु लाडकी सुनबाई योजनेसारख्या कोणत्याही योजनेवर अद्याप कोणताही औपचारिक निर्णय घेतलेला नाही.