शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (20:40 IST)

ग्रामसेवक, सुटीच्या दिवशी चोरायचा मंगळसूत्रे

कर्जफेड करण्यासाठी चांदवड तालुक्यातील एका संशयित ग्रामसेवकाने सुटीच्या दिवशी अधिक पैसे मिळवण्यासाठी शहरात येऊन थेट सोनसाखळ्या चोरण्याचा धंदा सुरू केला होता. या मध्यवस्तीत वाढत्या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी शक्कल लढवत एका संशयिताचे छायाचित्र पोलिस मित्रांच्या ग्रुपवर टाकले अन् हा बहाद्दर अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. विपुल रमेश पाटील असे या ग्रामसेवकाचे नाव असून त्याने शहरात पाच ठिकाणी सोनसाखळ्या चोरल्याची कबुलीही दिली आहे.
 
त्याच्याकडे एक दुचाकी व ११ तोळे सोन्याची लगड, मंगळसूत्रे असा ५ लाख १४ हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. पोलिस उपआयुक्त अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले, की गंगापूररोडवर सोनसाखळी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याने परिसरातील सीसीटीव्हीतील चित्रीकरण तपासण्यात आले. त्यात एक संशयित हा सोनसाखळी चोरी झालेल्या घटनेच्या ठिकाणी संशयास्पद फिरताना आढळला. गंगापूर पोलिसांनी हे छायाचित्र पोलिस मित्रांच्या ग्रुपवर टाकले. त्या आधारे एका पोलिस मित्राला आकाशवाणी टॉवर येथे हा संशयित आढळून आला. त्याने तातडीने पोलिसांना याबाबत कळवले असता पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचला. संशयित गर्दीच्या ठिकाणी उभा न राहता रस्त्याच्या कडेला उभा असल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्याला लागलीच ताब्यात घेतले. संशयिताची कसून चौकशी केली असता शहरात पाच ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याची त्याने कबुली दिली. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख, प्रवीण सूर्यवंशी, घनश्याम भोये, दीपक जगताप, तुलसी चौधरी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 
संशयित विपुल पाटील हा कधी भावाची दुचाकी, तर कधी पत्नीची मोपेड घेऊन नाशकात यायचा. विशेषत: गंगापूररोड, काॅलेज रोड भागातील रस्त्यांवर एकट्या महिलांना लक्ष्य करत तो सोनसाखळी चोरायचा. या प्रकाराची गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये मोठी चर्चा रंगली होती.
हा संशयिताची उंची ७ फूट असल्याने तो घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. उंची जास्त असल्याने त्याचे पाय दुचाकीच्या हँडलपर्यंत येत असल्याने याच वर्णनाच्या आधारे संशयिताचा पोलिसांनी माग काढत त्याला अटक केली.
संशयित हा रविवारी सुटीच्या दिवशी सोनसाखळी चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. रविवारी शासकीय सुटी असल्याने तो चांदवडमधून शहरात येत होता. गंगापूर, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ परिसरात तो एकट्या महिलांना हेरून सोनसाखळी चोरी करत होता.