नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लालच १० जणांच्या जीवावर बेतला
पंधरवड्यापूर्वी भल्या पहाटे झालेल्या लक्झरी बस ट्रक दुर्घटनेत एकूण १३ प्रवासी मृत्युमुखी पडले. आगाऊ बुकिंग न करता यवतमाळ-नाशिक प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या दहा प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच अपघातसमयी बसमध्ये चालकांसह साठ लोक होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.
यवतमाळ येथून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या स्लीप कोच लक्झरी बस (एमएच २९ एडब्लू ३१००) आणि आयशर ट्रक (जीजे ०५ बीएक्स ०२२६) यामध्ये जोरदार धडक झाली होती. धडकेनंतर संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे १२ प्रवासी होरपळून जागेवर ठार झाले होते, तर एका प्रवाशाने दोन दिवसांपूर्वी प्राण सोडले. ही भीषण दुर्घटना तपोवनाजवळ कैलासनगर चौफुलीवर शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती.
अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या अपघाताने ट्रॅव्हल्सकडून केल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसह रस्ता सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणेची मदत अशा सर्वच बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राणही गेले अन् साडेतीन लाखांची रोकडही जळाली
> यवतमाळ येथून नाशिकला कार खरेदीसाठी येत असलेल्या एका प्रवाशाचा या दुर्घटनेत नाशिकमध्येच मृत्यू झाला.
> कार खरेदीसाठी सोबत असलेल्या बॅगेत त्याने सुमारे साडेतीन लाख रुपये घेतलेले होते. या रोकडचीही राख झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.
> त्या प्रवाशाने नाशिकमध्ये राहणाऱ्या आपल्या भाच्याला प्रवासादरम्यान मी नाशिकला कार घेण्यासाठी येत असल्याचे फोनवरून कळविलेसुद्धा होते.
Edited by: Ratnadeep Ranshoor