बसमध्ये दिवाळी निमित्त लावलेल्या दिव्याने पेट घेऊन चालक, वाहकाचा होरपळून मृत्यू
सध्या सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. सर्वत्र रोषणाई आणि आतषबाजी करण्यात येत आहे. लखलखत्या दिव्यांची सर्वत्र उजळून निघत आहे. दिव्याने एका घरात अंधार केल्याची हृदयद्रावक घटना झारखंडची राजधानी रांचीमध्ये दिवाळीच्या रात्री घडली. रांचीच्या खादगढ़ा बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसला भीषण आग लागून ड्रायव्हर आणि कंडक्टरचा होरपळून मृत्यू झाला. मदन महतो आणि इब्राहिम अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. ही घटना दिवाळीच्या रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बस रांचीहून सिमडेगा मार्गावर धावत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री दोघेही बसमध्ये दिवे लावून झोपले होते. त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठिणगी बाहेर पडली आणि बसमध्ये आग लागली. त्यानंतर दोघांनाही इच्छा असूनही बसमधून बाहेर पडता आले नाही आणि दोघांनाही होरपळून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचली तो पर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती आणि बस चालक आणि कंडक्टर यांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले.
Edited By - Priya Dixit