शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (08:42 IST)

प्रेयसीपाठोपाठ त्यानंही सोडलं जग; सिडको परिसरातील घटना

दुचाकी चोरीच्या संशयावरून अंबड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी एकाने घरी जाऊन विषप्राशन करून आत्महत्या केली.ही घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली. काही दिवसांपूर्वी प्रेयसीने आत्महत्या केली होती. आफ्रोज हसन चौधरी (वय २०) व त्याचा मित्र हमिद हरून खान (१९, रा. शिवपुरी चौक, उत्तमनगर) शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मोरवाडी स्मशानभूमी रस्त्यावरून विनाक्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवरून जात असताना, पोलिसांना मिळून आले.

चोरीची गाडी असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दोघांना पोलिस ठाण्यात आणून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. आफ्रोज चौधरी याच्याविरुद्ध यापूर्वी इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ दुचाकीची कागदपत्रे नव्हती.
 
रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या भावाला बोलाविण्यात आले. नंतर समज देऊन दोघांनाही सोडून दिले. शनिवारी (ता.१६) सकाळी दहाला दुचाकीची कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात हजर होण्याची समज पोलिसांनी दिली. दरम्यान, पोलिस ठाण्याबाहेर पडल्यानंतर दोघांपैकी आफ्रोज याने रात्री एकच्या सुमारास घरातच विषप्राशन करून आत्महत्या केली. आफ्रोजचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या प्रेयसीने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. याच मानसिक तणावात आफ्रोज होता. यामुळेच मानसिक तणावामध्ये येऊन त्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.