गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 जून 2021 (08:03 IST)

सिन्नर -नांदूर शिंगोटेतील खासगी रुग्णालयावर आरोग्य विभागाचा छापा ? अनाधिकृत कोविड सेंटर सुरु केल्याचा आरोप

विडच्या रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नसताना गेल्या दोन महिन्यात शंभरहून अधिक रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार करणाऱ्या तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील खासगी रुग्णालयावर आरोग्य विभागाने १० जून रोजी छापा टाकून रुग्णांची नोंद असलेल्या नोंदवहीसह अनेक कागदपत्रे जप्त केल्याचे  समजते. त्यात बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच रेमेडेसिवीर इंजेक्शन देण्याची परवानगी नसताना हे इंजेक्शन्स वापरल्याचे पुरावे हाती लागल्याची चर्चा आहे. चार दिवसानंतरही आरोग्य विभागाने या खासगी रुग्णालयाच्या विरोधात कुठलीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
 
नांदूरच्या या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी उपचार करण्याचा परवानाच नाही. मुळात कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसल्यानंतर अशा रुग्णांवर खासगी रुग्णालयांनी कुठलेही उपचार न करता जवळच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना पाठवण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. असे असताना या खासगी रुग्णालयाने एप्रिल २०२१ ते जूनच्या १० तारखेपर्यंत परीसरातील १०० हून अधिक रुग्णांवर बेकायदेशीरपणे उपचार केल्याचे समजते. चास येथील एका रुग्णावर उपचार केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या पत्नीने जिल्हा पातळीवरील समितीकडे तक्रार करीत आपल्या पतीवर योग्य ते उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. आपल्या पतीला या  रुग्णालयात दोन रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आली. त्यापोटी आपल्याकडून मोठी रक्कम वसूल केल्याचा आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केल्याचे समजते.
 
या तक्रारीनंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य यंत्रणेने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयातील अधिक्षकांना तातडीने कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याची चर्चा आहे. अधीक्षकांसह एका पथकाने या रुग्णालयावर १० जून रोजी छापा टाकला असून त्यात अनेक कागदपत्रे जप्त केल्याचे समजते. मात्र, या पथकाने कारवाईबाबत गुप्तता पाळण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेत नांदूर-शिंगोटे भागात ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असतांनाही बेकायदेशीरपणे कोविड सेंटर चालवणाऱ्या या रुग्णालयच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही अथवा साधी नोटीसही बजावण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
या रुग्णालयाने १०० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेतले. त्यांच्याकडून ५० हजार ते १ लाख पर्यंतचे बिल वसूल केले गेले असल्याचे आरोप होत आहेत. या रुग्णांवर काय उपचार केले याची कागदपत्रे रुग्णालयाने ठेवली नाहीत. मात्र, उपचार झालेल्या रुग्णांची यादी या पथकाच्या हाती लागल्याचे समजते. या रुग्णालयात केवळ होमिओपॅथी उपचार करण्याची परवानगी असताना रुग्णांवर सरसकट अ‍ॅलोपॅथी उपचार करण्यात आल्याचे पथकाला आढळून आल्याचे समजते. शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करीत रुग्णांच्या जीवाशी खेळले गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही आरोग्य विभागाची चुप्पी अनेक प्रश्न निर्माण करत आहे. कोरोना महामारीचा गैरफायदा घेऊन रुग्णांची लूट करणे, त्यांच्यावर चुकीचे उपचार करणे अशा गंभीर बाबी आढळून आल्यानंतर खरे तर सदर रुग्णालयच्या विरोधात आरोग्य विभागाने फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. एवढ्या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकावरच कारवाई व्हायला हवी अशी चर्चा नांदूर परिसरात दबक्या आवाजात होत आहे.