शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (09:35 IST)

आरोग्य विभाग सांगत कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही

गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून राज्य सरकारवर करोनाविषयीची आकडेवारी लपवली जात असल्याची टीका केली जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्य सरकारकडून मृतांची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या आरोग्य विभागानेच या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा माहिती प्रलंबित राहते. तथापि ती अद्ययावत करण्यासाठी जिल्हा आणि मनपा यांचेकडे नियमित पाठपुरावा केला जातो”, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे. यासाठी नेमकी रोजची रुग्णांची आकडेवारी कशी तयार केली जाते, याची प्रक्रियाच आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.