गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 5 जून 2021 (18:41 IST)

कोरोना व्हायरस : मुंबईत ही मायलेकाची जोडी आज देतेय शेकडो गरजूंना जेवण

जान्हवी मुळे
मुंबईच्या मालाड स्टेशनजवळची एक गल्ली. वेळ रात्री आठ-साडेआठची. कर्फ्यूमुळे रस्त्यावर फारशी गर्दी नाही. शंभर दोनशे लोक रांगेत उभे आहेत आणि आई-मुलाची एक जोडी त्यांना जेवण वाढतेय.
 
गेल्या वर्षीपासून जवळपास दररोज इथे साधारण असंच दृश्य पाहायला मिळतं. हर्ष आणि हीना मांडविया हे मायलेक आणि त्यांची टीम रोज शेकडो लोकांना जेवण वाढतात.
 
कोव्हिडच्या साथीनंतर पहिल्या लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला एक छोटासा उपक्रम 'फीड द नीडी' (गरजूंना खाऊ घाला) नावाची मोहीमच बनला आहे. त्यांनी गेल्या अकरा महिन्यांत 26 हजारांहून अधिक थाळ्या जेवण वाढलं आहे. त्यासाठी ते सोशल मीडियाद्वारा निधी उभा करतात.
 
हीना सांगतात, "मला वाटलंही नव्हतं आम्ही इतके दिवस हे काम करत राहू. पण लोकांकडून मदत येत गेली, आम्ही जेवण वाढत राहिलो आणि अजूनही हे काम सुरू आहे."
 
स्वतः हीना यांची कहाणीही संघर्षानं भरलेली आहे. एकेकाळी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडलेल्या हीना यांनी पुढे एक यशस्वी व्यवसाय तर उभा केलाच, शिवाय त्या माध्यमातून आज त्या शेकडो लोकांचं पोट भरत आहेत.
अशी झाली 'फीड द नीडी' मोहिमेची सुरुवात
हीना गेली 22-23 वर्ष डबे पुरवण्याचं काम करतात. कांदिवली पूर्वेला त्यांची 'हर्ष थाळी अँड पराठाज' ही छोटीशी खानावळही आहे.
 
तर 27 वर्षांचा हर्ष एका खासगी कंपनीत काम करतो आणि सोबतच हीना यांना त्यांच्या व्यवसायात मदतही करतो.
तो सांगतो, "22 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली, तेव्हा आम्हीही आमचं दुकान पंधरा दिवस बंद ठेवलं. आमच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही भीती वाटत होती, त्यांना घरी जावसं वाटत होतं."
 
हीना सांगतात, "पंधरा दिवसांनी आम्ही दुकान उघडायचं धाडस केलं. कारण आम्हाला हॉस्पिटलमधून फोन यायला लागले. त्यांना तिथे काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेससाठी जेवण हवं होतं."
 
काही दिवसांनंतर त्यांच्या नेहमीच्या ग्राहकानं त्यांना एक विनंती केली, ज्यामुळे फीड द नीडी या मोहीमेची सुरूवात झाली. हर्ष त्याविषयी माहिती देतो, "आमचे नेहमीचे ग्राहक अभिनव चौधरींनी संपर्क साधला. ते म्हणाले की 'मला गरीबांना 100 थाळी जेवण वाटायचं आहे. पण मी जाऊ शकत नाही, तर तूच जाशील का?' मी हो म्हणालो, ठीक आहे, मी जाईन. दुसऱ्याच दिवशी आम्ही एका गुरुद्वाराबाहेर 100 लोकांना जेवण वाटलं."
 
तेव्हा सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. "मुंबईत अनेकजण जेवणासाठी डब्यावर अवलंबून असतात. पण त्या दिवसांत अगदी पैसे द्यायची तयारी असलेल्यांनाही जेवण विकत मिळत नव्हतं, कारण कडक लॉकडाऊनमुळे सगळंच बंद होतं. गरीबांवर तर मोठंच संकट होतं," असं हीना सांगतात.
त्या दिवशी शंभर लोकांना जेवण वाटताना हीना यांच्या डोक्यात एक विचार सुरू होता. "लोकांच्या चेहऱ्यावरची अगतिकता आणि आनंद मी विसरू शकणार नाही. मला वाटलं, या लोकांना आज तर जेवण मिळालं, पण उद्याचं काय?"
 
त्यांनी आपला विचार हर्षला बोलून दाखवला. हर्षनं तो अनुभव सोशल मीडियावर शेअर केला.
 
"मी काही फोटो, व्हीडिओ त्यादिवशी संध्याकाळी सोशल मीडियावर पोस्ट केले. मला अभिनवचं कौतुक करावंसं वाटत होतं आणि आभार मानायचे होते. पण त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. काहींनी फोनही केले. आम्हालाही मदत करायची आहे असं ते म्हणत होते."
 
तिथूनच या मोहिमेची सुरूवात झाली. हीना सांगतात, "लोकांना मदत करावीशी वाटत होती, पण बाहेर पडणं शक्य नव्हतं. मग आम्ही ती जबाबदारी घेतली. मला तेव्हा माझे जुने दिवस आठवले, कारण एकेकाळी माझ्यावरही अशी वेळ ओढवली होती."
 
मायलेकांनी कसा केला संकटांशी सामना?
हीना मूळच्या गुजरातमधील जामनगरच्या. पण रजनी मांडविया यांच्यासोबत लग्नानंतर मुंबईत आल्या. घरची परिस्थिती आधी चांगली होती, पण एका दिवशी अचानक सगळं चित्र बदललं.
 
कामासाठी पूर्व आफ्रिकेत राहणाऱ्या रजनी यांचा 1998 साली अपघातात मृत्यू झाला. तेव्हा हीना 27 वर्षांच्या होत्या आणि हर्षचं वय होतं पाच वर्ष.
 
"ज्या विमानानं ते परत येणार होते, त्याच विमानानं त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. काय करावं हेही मला काही काळ सुचत नव्हतं."
 
नंतर परिस्थिती बिघडतच गेली. "15 दिवस असे होते, जेव्हा माझ्याकडे पोटापाण्याची सोय नव्हती. मी एकवेळच जेवायचे. हर्षला दोनदा खाऊ घालायचे आणि मी चहा बिस्किट खाऊन राहायचे."
काही काळ नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी मदत केली, पण पुढे काय हा प्रश्न होताच. हीना यांना त्यावेळी दुसऱ्या कुणाचा आधार नव्हता. "हर्ष लहान असल्यानं मी बाहेर जाऊन नोकरी करू शकत नव्हते. ना काही कमावू शकत होते. घरात राहून काय करायचं?"
 
मग त्यांनी जेवण बनवण्याचं, डबे पोहोचवण्याचं काम सुरू केलं.
 
"कोणीतरी मला म्हणालं, 'बिचारी-बापडी म्हणायला सगळे येतील, कापडी द्यायला कोणी येणार नाही.' ती एक गुजराती म्हण आहे. म्हणजे दुःख व्यक्त करायला, हळहळायला सगळे येतील, पण मदत कोणी करणार नाही. "
 
त्यांनी शेजारच्या एका वृद्ध महिलेला डबा द्यायला सुरुवात केली. "त्यांनीच मला व्यवसाय सुरू करायलाही मदत केली. मी डबे बनवायचं काम करायचे. हर्ष ते पोहोचवायला मदत करायचा. सहा वर्षांचा झाल्यापासून तो हे काम करतो आहे."
 
हळूहळू बिझनेस वाढत गेला. चार पाच वर्षांत त्यांनी एक खानावळ सुरू केली आणि काही गरजू माणसांना तिथे कामही दिलं. आज तिथूनच 'फीड द नीडी' मोहिम सुरू आहे.
परोपकाराची परतफेड
"मला त्या काळात अनेकांनी मदत केली होती. हर्ष एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये होता. माझी परिस्थिती पाहून शाळेच्या संचालकांनी त्याला फीमध्ये मोठी सवलत दिली. म्हणून त्याचं शिक्षण व्यवस्थित सुरू राहिलं."
 
लोकांनी मदतीचा हात दिल्याचं हीना अजूनही विसरलेल्या नाहीत. त्यातूनच इतरांना मदत करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचं त्या सांगतात.
 
"लोकांना, नुसतं पैसे दान करण्यापेक्षा पैसे कमावण्याचं माध्यम दिलं, तर ते कधीही जास्त चांगलं. विशेषतः महिला त्यातूनच स्वावलंबी बनू शकतात. स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरण्याचा मार्ग शोधू शकतात."
 
लॉकडाऊनच्या काळात आसपास राहणाऱ्या काही महिलांना नोकरी गमवावी लागली. तेव्हा हीना यांनी त्यांना काम पुरवायला सुरुवात केली.
पूनम पाटील त्यापैकीच एक आहेत. पूनम शिकवणी घ्यायच्या तर त्यांचे पती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायचे. मात्र गेलं वर्ष दीड वर्ष दोघांचंही काम बंद आहे.
 
सध्या पूनम हर्ष आणि हीना यांना पोळ्या बनवून देतात.
 
"उत्पन्नाचा स्रोत बंद झाला, पण हे एक चांगलं व्यासपीठ मिळालं. माझे घरचेही यात मला मदत करतात. आम्ही आमच्या कुटुंबासाठी थोडंफार का असेना काही मिळवू शकतोय. तसंच हे जेवण लोकांना वाटलं जाणार आहे, म्हणजे आम्ही दुसऱ्यांसाठी काही करूही शकतो आहोत."
 
आपल्या छोट्याशा घरातूनच हीना चुरमा लाडू आणि गूळपापडीसारखे पदार्थही बनवतात, ज्यात पूनमसारख्या महिलाही मदत करतात.
 
सध्या या दोघांच्या व्यवसाय आणि मोहिमेतून नऊ-दहा जणांना रोजगार मिळतोय.
 
कोव्हिडमुळे बदलेलं वास्तव
हर्ष, हीना आणि त्यांची टीम आता घरी विलगीकरणात असलेल्या कोव्हिड रुग्णांनाही डबे पुरवतात आणि सेवाभावी संस्थांना सवलतीत जेवण देतात.
 
तो कधी एखाद्या वस्तीवर, कधी स्टेशनबाहेर किंवा रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना फूड पॅकेट्सही वाटू लागला आहे. कधी कधी लोक मास्क, टूथपेस्ट, अशा वस्तूही पाठवतात ज्या वाटण्याचं कामही ते स्वीकारतात.
पण त्यांनी सुरू केलेलं मोफत जेवण वाटपाचं काम 390 दिवसांनंतरही सुरू आहे.
 
हर्ष सांगतो, "कधीकधी वाटतं, हे काम बंद होईल तो दिवस किती चांगला असेल. म्हणजे लोकांना मोफत जेवण घेण्याची वेळ उरणार नाही. पण सध्या तरी तो दिवस लवकर येईल असं दिसत नाही."
 
मुंबईच्या रस्त्यांवर ते जेवण वाटत असताना या संकटाची तीव्रता आणखी जाणवते.
 
हर्ष सांगतो, "जेवणासाठी रांगेत उभे राहिलेले सगळेच गरीब नसतात. काहीजण असेही आहेत जे अगतिक आहेत. कोव्हिडमुळे त्यांच्या आयुष्यावर एवढा परिणाम झाला आहे, की त्यांच्याकडे कमाईचं काही साधन उरलेलं नाही."
"एकदा तर मी एका रस्त्यावर जेवण वाटत होतो, तेव्हा शेजारच्या टॉवरमधून काहीजण आले. त्यांच्या हातात आयफोन होते. ते मनोरंजन क्षेत्रात काम करत होते, पण सगळ्या इव्हेंट्स वगैरे बंद असल्यानं त्यांना जेवणही मिळेनासं झालं होतं."
 
कोव्हिडची साथ संपली तरी त्यानं निर्माण झालेल्या भावनिक, मानसिक आणि आर्थिक समस्या इतक्यात संपणार नाहीत, असं हर्ष आणि हीनाला वाटतं.
 
ते सांगतात, "सरकारला किंवा अधिकाऱ्यांना दोष देत राहण्यापेक्षा आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो, याचा विचार करायला हवा. आम्हाला कुणी मदत केली होती, त्यातून आम्हाला दुसऱ्यांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. आता आमच्याकडून मदत मिळालेल्यांनीही आणखी दुसऱ्यांना मदत करावी, म्हणजे आपण सगळे यातून बाहेर पडू, असं मला वाटतं."