रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (08:36 IST)

कोकणात मुसळधार, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार

राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर शनिवारी (१७ ऑक्टोबर) ओसरणार असून, शुक्रवारी अर्थात आज कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
बंगालच्या उपसागरातून आलेल्या आणि अरबी समुद्राच्या दिशेने निघालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाने महाराष्ट्रातून जात असताना मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने हाहाकार उडवून दिला आहे. मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. बुधवारी पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा दिला. बाष्प घेऊन आलेला हा पट्टा आता कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांवर स्थित आहे. त्यामुळे १६ ऑक्टोबरला या भागांत काही ठिकाणी  मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा पट्टा पुढे अरबी समुद्रात राज्याच्या किनारपट्टीवरून गुजरातच्या किनारपट्टीवर जाणार आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर कमी होईल.
 
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.