बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 नोव्हेंबर 2023 (20:06 IST)

नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

nashik rain
नाशिक शहर आणि ग्रामीण भागात हवामान विभागाच्या  अंदाजानुसार रविवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर काहीसे ऊन देखील पडले होते. मात्र, यानंतर चार वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा ढग दाटून आले व त्यानंतर पाच वाजेच्या सुमारास पावसाने नाशकात जोरदार हजेरी लावली. पुढे संध्याकाळी सात वाजेपर्यत पाउस सुरुच होतो. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
 
सकाळपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण होते. सुर्यदर्शनही तुरळक झाले. याशिवाय आज पहाटेपासूनच पावसाचे थेंब पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. तर हवामान विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता तो  खरा ठरला. तसेच जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून हिवाळा व पावसाळ्याचे एकत्र दर्शन झाले.
द्राक्षबागांचे मोठे नुकसान
निफाडसह तालुक्यातील उत्तर भागात उगांव, शिवडी खॆडे, नांदुर्डी, थेटाळे भागात  दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. यात द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
अनेक ठिकाणी द्राक्षबागांच्या मणीसेटींग तसेच फुलोरा अवस्था होत्या. मुसळधार पावसासह जोरदार गारा झाल्यामुळे मणीगळ झाली आहे. शिवाय तयार झालेल्या द्राक्षमण्यांना चिरा गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतातील पिकांसह जनावरांचा चारा जोरदार वाऱ्याने जमीनदोस्त झाला आहे.