बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (07:43 IST)

गडचिरोली पोलीस दलाची अभिमानास्पद कामगिरी; नक्षल कॅम्प केला उद्ध्वस्त

नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या भामरागड उपविभागांतर्गत येणाच्या मुरुमभुशी गावाजवळील महाराष्ट्र-छत्तीसगढ़ सीमेवरील जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाने विशेष नक्षलविरोधी अभियान राबवून नक्षल कॅम्प उद्ध्वस्त करण्याची अभिमानास्पद कामगिरी केली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
 
या पथकाचे जवान (सी-६०) नक्षलविरोधी अभियान राबवित होते. सलग २ दिवस राबविलेल्या  अभियानात ०४ मार्चच्या पहिल्याच दिवशी पथकाला संशयास्पद नक्षल दलम आढळून आले. नक्षलवाद्यांनी प्रथम पोलीस जवानांवर गोळीबार केला. जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यामुळे माघार घेत नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळ काढला. त्या भागात शोध मोहीम राबविली असता, त्या परिसरात नक्षलवाद्यांनी लावलेला मोठा कॅम्प आढळला. तो कॅम्प सी-६० जवानांनी उद्ध्वस्त करुन टाकला तसेच त्या कॅम्पमध्ये शस्त्र बनविण्याच्या मशिनरी, स्फोटके व हत्यारे आदी साहित्य सापडले. तेही सी-६० जवानांनी जप्त केले. परत येत असताना सी-६० पथकावर पुन्हा नक्षलवाद्यांकडून जोरदार गोळीबार झाला. त्यास पोलीस पथकाने प्रत्युत्तर दिले. तेव्हा नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला.
 
सदर जंगल परिसरात नक्षल्यांचे शस्त्र तयार करण्याचे साहित्य आढळल्याने त्या भागात नक्षल असल्याचा संशय बळावला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ०५ मार्च रोजी पुन्हा त्याच भागात अभियान तीव्रपणे राबविण्यासाठी आणखी विशेष अभियान पथक (सी-६०) घटनास्थळावर पाठविण्यात आले. विशेष अभियान पथकाच्या दोन्ही समूहांवर पुन्हा नक्षलवाद्यांनी जोरदार गोळीबार केला. तेव्हा सी-६०च्या बहादूर जवानांनी नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले यात नक्षलवाद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सी-६० पथकाच्या उत्कृष्ट अभियान रणनीती व बळाच्या जोरावर नक्षलवाद्यांना पळवून लावण्यात जवानांनी यश मिळविले. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या अबुझमाडसारख्या नक्षलीदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात जाऊन सी-६० च्या बहादूर जवानांनी नक्षलचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे माड भागातील नक्षलवादाला जबर हादरा बसला. याचा फायदा तेथील नक्षली कारवाया कमी होण्यास नक्कीच होईल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.