1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (11:18 IST)

“मधाचे गाव पाटगाव” “येताय ना.. पाटगावचा मध चाखायला… !”

Patgaon
social media
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. नाबार्ड, जिल्हा नियोजन समिती व महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करुन इथल्या मध उद्योगाला चालना देण्यात येत आहे.
 
पाटगाव परिसरात मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देवून पाटगावचा मध जगभरात पोहचवण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाच्यावतीने प्रयत्न होत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने 226.71 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आतापर्यंत 149.82 लाख निधी वितरीत केला असून यातील 31.71 लाख रुपये निधीतून मधाचे गाव पाटगाव उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून मध उद्योगाबरोबरच पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देवून पाटगाव परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. “मधाचे गाव पाटगाव” उपक्रमाचा लोकार्पण सोहळा शुक्रवार 27 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पाटगाव परिसरात तयार होणारा मध शुद्ध आणि नैसर्गिक असून इथला मध नक्की चाखायला हवा…!
 
सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य ऐतिहासिक गाव.  कोल्हापूर शहरापासून साधारण 90 किलोमीटर अंतरावर असलेले 1 हजार 502 लोकसंख्या असलेले 375 कुटुंब संख्येचे हे गाव. पाटगावचे क्षेत्रफळ 1हजार 58.73 हेक्टर आहे. पूर्वीपासूनच मध हा त्याच्या शुद्धतेसाठी आणि आरोग्यदायी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरात मधमाशा पालन उद्योग केला जातो. पाटगाव परिसरात वर्षभरात साधारण 8 ते 10 टन मध उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून आता ‘मधाचे गाव पाटगाव’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना याठिकाणी राबविण्यात येत आहे.
 
राष्ट्रीय पातळीवरील संस्थेकडून होणार पाटगावचा विकास – शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 750 हून अधिक गावांमधून केवळ 35 गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रॅम, जी -20, केंद्रीय पर्यटन मंत्रालय व केंद्रीय वन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने या गावांचा वर्षभर विकास करण्यात येणार आहे. रुरल टुरिझम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया ही देशपातळीवरील संस्था देशातील या 35 गावांचा विकास करणार आहे.
 
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेचे सहकार्य-  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने ‘मधाचे गाव पाटगाव’हा उपक्रम राबविण्यात येत असून याद्वारे ही गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रोत्साहन देत निधी उपलब्ध करुन दिला. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटगावमधील उर्वरित कामांच्या नियोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच यादृष्टीने ते प्रयत्नशील आहेत. मध विक्री व पर्यटनातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर यांनी सुरुवातीपासूनच या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी यासाठी सहकार्य केले आहे. मध उद्योगाबरोबरच या ठिकाणच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी वेळोवेळी बैठका घेवून सुक्ष्म नियोजन केले. तर जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी हे या उपक्रमाची अंमलबजावणी करत आहेत. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाबार्ड, खादी व ग्रामोद्योग विभाग, महसूल, ग्रामविकास, पर्यटन विभागासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी यासाठी समन्वयाने काम केले आहे.
 
पर्यावरणपूरक शाश्वत विकास- पाटगावमध्ये पाटगावसह पाच ग्रामपंचायती एकत्र येवून याठिकाणी तयार होणाऱ्या शुद्ध व नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. सामुहिक सुविधा केंद्र व कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या भागाचा विकास साधण्यात येत असून मधाच्या थीमवर गावाचे सुशोभीकरण होत आहे. याठिकाणी माहिती केंद्र, बी-ब्रीडिंग प्रशिक्षण, मधमाशा पुरक व औषधी गुणधर्म असलेली  वृक्षलागवड करण्यात येत आहे. बी- ब्रीडींगमधून मधमाशांची संख्या वाढवून परागीभवनाची वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक शाश्वत विकासाला प्राधान्य देत दिवसेंदिवस कमी होणारी मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी पाटगाव मधाचे गाव ब्रँड तयार करुन मधाला योग्य बाजारभाव मिळवून देवून मध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
 
आजूबाजूची गावे होणार स्वयंपूर्ण- पाटगाव परिसरात मधमाशा पालनासाठी नैसर्गिक परिस्थिती अनुकुल आहे. मधाच्या गावाला भेट देणाऱ्या पर्यटक, शालेय विद्यार्थी सहलींना मार्गदर्शनाकरीता भुदरगड तालुक्यात प्रवेशापासून ते मधाच्या गावात पोहोचेपर्यंत व गावाच्या वेशीवर दिशादर्शक फलक तसेच गावात मधाच्या गावाचा आकर्षक लोगो तर मधपाळांच्या घरावरही नोंदणीकृत लोगो, फलक लावण्यात आले आहेत. अधिकाधिक मध उत्पादकांना प्रशिक्षण देणे, मधपाळांना मधपेट्या देण्यासह आवश्यक कर्ज पुरवठा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. पाटगावसह शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, तांब्याची वाडी या ग्रामपंचायती अंतर्गत गावांमध्ये मधपाळ तयार करुन येथील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ‘पाटगाव मध उत्पादक शेतकरी कंपनी’च्या माध्यमातून मध उत्पादक, विक्रेत्यांसह महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन देत मध निर्मिती व विक्री उद्योग व पर्यटनपूरक उद्योगांतून पाटगावबरोबरच आजूबाजूच्या गावांना स्वयंपूर्ण होण्यासाठी चालना देण्यात येत आहे.
 
पर्यटन स्थळांचा विकास – पाटगावमध्ये शिवकालीन संत मौनी महाराज यांची जिवंत समाधी आहे. याव्यतिरिक्त वेदगंगा नदीवर 1990मध्ये बांधण्यात आलेले पाटगाव धरण म्हणजेच ‘मौनी जलाशय’ गावाच्या जवळच आहे. हे धरण आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेला रांगणा किल्ला ही प्रमुख पर्यटन स्थळे पाटगाव परिसरात आहेत. या परिसरातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी कोल्हापूर ते पाटगाव मार्गावर माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच पर्यटन संचालनालयाच्यावतीने पर्यटकांसाठी याठिकाणी न्याहारी व निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी सुविधा अधिक दर्जेदार पध्दतीने देण्यात येणार  आहेत.
 
मधाचे संकलन, प्रक्रीया, ब्रॅन्डीग, पॅकेजिंग व मार्केटिंग- पाटगाव परिसरातील 250 मधपाळांना कौशल्यांचे राष्ट्रीय प्रमाणीकरण व सुलभ पतपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच 100 मधपाळांना बी-ब्रीडिंगचे प्रशिक्षण देवून पेटी वाटपातून उत्पन्नाची संधी देण्यात येणार आहे. मध उत्पादक शेतकरी कंपनीमध्ये सहभागी पाटगाव व आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायतीतील मधपाळांकडून मध उत्पादन करण्यात येत आहे. या मधपाळांना मंडळामार्फत प्रशिक्षण देऊन सेंद्रिय मध संकलन करण्यासाठी स्टेनलेस स्टील भांडी पुरविण्यात येणार आहेत. मध संकलनानंतर पाटगाव येथे प्रक्रीया युनिट उभारुन प्रक्रिया झालेल्या मधाचे लेबलिंग, पॅकेजिंग व ब्रँडींग करुन तो मार्केटींगसाठी उपलब्ध होईल.
 
वसाहतींचे स्थलांतर करण्याविषयी जनजागृती- हवामान व पर्यावरणातील बदलामुळे मधमाशांच्या वसाहती जगवण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्यासाठी त्या एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी राज्यांतर्गत व राज्याबाहेर वाहतूक करुन न्याव्या लागतात. यामुळे प्रतिकुल हवामानापासून मधमाशांच्या वसाहतींचे संरक्षण करता येते. वसाहती जगवण्यासाठी त्यांचे स्थलांतर करण्याविषयी मधपाळांना प्रोत्साहन व मदत देणे, स्थलांतराच्या ठिकाणी तंबू उभारणे, वसाहती जगविण्यासाठी साखरपाक देणे अशा उपाययोजना करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
 
शैक्षणिक अभ्यासाला प्रोत्साहन- पाटगाव येथील सदाहरीत जंगलात मधाचे औषधी व उपयुक्त गुणधर्म आहेत. या परिसरातील सातेरी मधमाशांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करुन इतर ठिकाणच्या मधापैकी पाटगाव मधील मध अधिक उत्कृष्ट असल्याबाबत शैक्षणिक अभ्यासाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
 
भविष्यातील नियोजन – गावातील नोंदणीकृत मधपाळांकडून मध संकलन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांना मधाची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन देणे, स्थानिक पातळीवर मधपाळांना मधाची शुध्दता व गुणवत्ता तपासणीसाठी पर्यटकांना लाईव्ह डेमो उपलब्ध करुन देणे. मध तपासणीसाठी प्रयोगशाळा, प्रोसेसिंग व पॅकेजिंग सुविधा, ब्रॅन्डींग करुन स्थानिक पातळीवर सीएफसी केंद्रा मार्फत विक्री केंद्र उभारणे, मधाचे गाव जागतिक नकाशावर येण्यासाठी चांगले रस्ते, दिशा दर्शक फलक लावणे व नकाशा रेखांकन करुन घेणे. मध आणि मधाचे उपयोग व उत्पादने याबाबत साहित्य पुस्तके, सीडी विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे, मध व मधाची उप उत्पादने तयार करण्यासाठी फॅकल्टीची निवड करून मधपाळांना मधाची उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण देणे व तयार झालेला माल सीएफसी केंद्र, खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत विक्री करणे. गाव पातळीवर तयार झालेल्या मालाचे पॅकेजिंग, बॅन्डींगसाठी मार्गदर्शन करणे.  मध संकलन व विक्रीसाठी ने आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करणे आदी सुविधाही उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
 
शुद्ध व नैसर्गिक मध खरेदी करण्याची संधी – पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र तयार केले आहे. येथे भेट देणाऱ्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पाहता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी हनी पार्क (मध उद्यान) तयार करण्यात येणार आहे. पाटगाव मध्ये सुरु होणाऱ्या सामुहिक सुविधा केंद्रात पाटगाव परिसरात तयार होणाऱ्या मधाचे संकलन प्रक्रिया व विक्री होणार असल्यामुळ येणाऱ्या पर्यटक व नागरिकांना शुद्ध व नैसर्गिक मध व त्यापासून तयार होणारी दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळेल, अशी माहिती जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जौंजाळ यांनी दिली.
 
पाटगावमध्ये उत्तम दर्जाच्या मधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि मार्केटिंग बरोबरच सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून मध प्रक्रिया केंद्र, प्रयोगशाळा, प्रशिक्षण व माहिती दालन करण्यात आले आहे. प्रशासन आणि खादी व ग्रामोद्योग विभागाच्या वतीने पाटगावमधील मधपाळांना मध उत्पादन व विक्रीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे. या ठिकाणी माहिती केंद्र, सेल्फी पॉईंट, दिशादर्शक फलक तसेच होम स्टे, हॉटेल, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून पर्यटन पूरक व्यवसायांना चालना देण्यात येत असून यामुळे पाटगावचा ‘मध’ जगभरात पोहोचेल व यातून रोजगार निर्मिती होवून या डोंगराळ भागातील गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. या गोष्टी सुरु आहेतच .. पण पाटगावचा शुद्ध आणि नैसर्गिक मध चाखायचा असेल.. इथलं निसर्ग सौंदर्य पहायचं.. अनुभवायचं असेल तर ‘पाटगावला यायलाच लागतंय.. 
 


Edited By - Ratnadeep Ranshoor