बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 मे 2021 (10:28 IST)

गोळीबार प्रकरण कसे घडले? सांगत आहेत आमदार अण्णा बनसोडे …

गोळीबार प्रकरणावर आमदार अण्णा बनसोडे म्हणाले, 'मी सुखरूप आहे, तुम्ही शांततेत रहा'
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे त्यांच्या कार्यालयात उपस्थित असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना हे प्रकरण कसे घडले, याबाबत स्वतः आमदार अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली.
आमदार बनसोडे यांनी ‘मी सुखरूप आहे. तुम्ही शांततेत रहा’, असे आवाहन केले.
 
आमदार बनसोडे म्हणाले, अँथोनी नावाचा पालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे. मी त्याला वैयक्तिक ओळखत नाही. सुमारे चार वर्षांपासून तो शहरात काम करतो. तानाजी पवार नावाचा त्याचा सुपरवायझर आहे. तानाजीला माझ्या ‘पीए’ने फोन केला आणि दोन मुलं कामाला घेण्यासाठी सांगितले. त्यावेळी बोलताना त्याने अरेरावी केली.
 
त्यानंतर तानाजी पवार माझ्या कार्यालयात आला. तो आत येऊन बसला. त्याला आणि त्याच्या मालकाला देखील झालेला विषय सोडून देण्याबाबत मी सांगितले. पाच ते सात मिनिटे तो बसला. नंतर बाहेर आला आणि फायरिंग केली.
 
आमदार बनसोडे पुढे म्हणाले, फायरिंग माझ्या दिशेने केली. पण कार्यालयात उपस्थितांनी त्याला खाली पाडले  आणि चोप दिला. दरम्यान, पवार याने दोन फायर केल्या होत्या. तानाजी पवार माझ्या कार्यालयात येताना पूर्वनियोजित आला होता. येताना त्याचा मेहुणा आणि एक साथीदार घेऊन आला होता. त्यांच्याकडे देखील पिस्टल होती.
 
या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. तपासात सर्व बाबी निष्पन्न होतील. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील माझ्या मित्रांना विनंती आहे की, मी सुखरूप आहे. तुम्ही शांततेत रहा, असे आवाहन देखील आमदार बनसोडे यांनी केले आहे.