शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 ऑगस्ट 2022 (11:41 IST)

विनायक मेटेंचा अपघात नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली माहिती

vinayak mete
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंचं अपघाती निधन झालं आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर ही घटना घडली. आज (14 ऑगस्ट) पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
 
या अपघातात मेटेंना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला आणि पायाला मार लागला. त्यांच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
एमजीएमचे मेडिकल संचालक डॉ. कुलदीप संकोत्रा यांनी सांगितलं की, "विनायक मेटे यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली होती. अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे."
 
"सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी त्यांच्या गाडीला अपघात झाला. सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा लगेच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर आम्ही त्यांना मृत घोषित केलं.
 
"मी स्वत: त्यांना पाहिलं. त्यांच्या डोक्यावर जबर मार लागला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल."
 
अपघात कसा झाला?
विनायक मेटे यांच्या गाडीला ज्या भागात अपघात झाला, त्या भागाचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी माध्यमांना माहिती दिली.
 
 
ते म्हणाले, "एक मोठा ट्रक होता आणि त्याला पाठीमागून गाडीनं ठोकलं असं सकृतदर्शनी कळत आहे. पण, तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील."
 
"सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघातानंतर ट्रक निघून गेलाय. तपासामध्ये बऱ्याचशा गोष्टी निप्षन्न होतील. यात जवळपास 8 टीम तपास करत आहेत," असंही ते म्हणाले.
 
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
विनायक मेटे हे मराठा आरक्षणाच्या आजच्या बैठकीला येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे. मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांची भावना होती, शासन त्यासोबत आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
 
एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटेंच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विनायक मेटे यांच्या निधनाचं वृत्त कळल्यानंतर पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "आम्ही विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो."
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं, "महाराष्ट्राच्या विकासकामात विनायक मेटेंनी नेहमी भाग घेतला. एक चांगला मित्र आम्ही गमावलाय. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही. आपल्याला भारताला अपघातमुक्त करायचं आहे, हीच विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली ठरेल."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं, "मराठवाड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि कष्टानं स्वत:चं नेतृत्व उभं केलं, असे नेते म्हणून विनायक मेटेंची महाराष्ट्राला ओळख आहे. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती."
 
एबीपी माझाशी बोलताना भाजप नेते विनोद तावडे यांनी विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटलं की, "विनायक मेटेंचं निधन ही धक्कादायक बातमी आहे. त्यांच्यासारखा नेता जाणं हे धक्कादायक आहे. मराठी शेतकरी, शेतमजूर यांना न्याय देणारे मेटे नेते होते. त्यांचं अशावेळी जाणं खूप धक्कादायक आहे. आम्ही एकत्र काम केलं. समाजाला न्याय मिळवून देण्यात ते अतिशय अग्रेसर होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."
 
विनायक मेटेंचं असं जाणं अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
 
"मराठा आरक्षणाच्या विषयासाठी सातत्यानं झगडणारा माणूस असा अचानक गेला, एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे," या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"समाजासाठी परखड भूमिका मांडणारे एकमेव आमदार होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. समाजाला न्याय मिळावा, ही मेटे यांना खरी श्रद्धांजली असेल," असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.
 
माजी आरोग्य मंत्रा राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं, "मराठा समाजातील एक धडाडीचे नेतृत्व, शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. बीड जिल्ह्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे नेतृत्व हरपले आहे."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मेटेंच्या निधनावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "माझा आणि मेटेंचा परिचय नव्वदच्या दशकापासून आहे. मराठा आरक्षण, शिवस्मारकाचं काम, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी विधानपरिषदेत त्यांनी नेहमी आवाज बुलंद केला."