शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जून 2022 (08:59 IST)

विधानसभेत बहुमत चाचणी नेमकी कशी घेतली जाते?

uddhav devendra
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून उद्धव ठाकरे अल्पमतात असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी केली आहे त्यामुळे येत्या एक दोन दिवसात राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
 
पण ही 'फ्लोअर टेस्ट' म्हणजे काय ? त्याची प्रक्रिया कशी असते?
 
बहुमत चाचणी कशी घेतात याचा घेतलेला हा आढावा.
 
बहुमत चाचणी म्हणजे काय?
बहुमत चाचणी, त्याला इंग्लिशमध्ये Floor test असंही म्हणतात. आपल्याकडे बहुमत आहे, हे सिद्ध करण्यासाठी हा ठराव मांडला जातो.
 
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सत्ताधारी पक्षाकडे सरकार स्थापन करण्यासाठी लागणारं बहुमत आहे की नाही, ते बघायला हा प्रस्ताव विधानसभा किंवा लोकसभेत मांडला जातो.
 
ही एक घटनात्मक तरतूद आहे, ज्याअंतर्गत राज्यपाल मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाचं बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात. राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नेमणूक मात्र राज्यपाल करतात.
 
जेव्हा एका पक्षाला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळतं, तेव्हा राज्यपाल त्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्री म्हणून नेमणूक करतात. पण जेव्हा कुणाकडे बहुमत आहे हे स्पष्ट नसेल तेव्हा सदनात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 सदस्य आपल्याला पाठिंबा देतात, असं सरकारला सिद्ध करावं लागतं.
 
संख्याबळ
सध्या महाराष्ट्रात विविध पक्षांकडे असलेल्या आकडेवारीवर एक नजर टाकूया-
 
गुवाहाटी येथे सध्या वास्तव्यास असलेले आमदार 49 आहेत.
शिवसेनेचे आमदार 39 आणि अपक्ष आमदार 10
बहुमतासाठी आवश्यक आकडा आहे - 145
आता शिवसेनेचे गुवाहाटीचे आमदार गैरहजर राहिल्यास बहुमताचा आकडा कमी होतो.
 
287 मधून 39 आमदार वजा केल्यास आमदारांचा आकडा 248 होतो.
 
आता भाजपच्या नेत्यांचा दावा आहे की त्यांच्याकडे 129 आमदारांचं समर्थन आहे.
 
भाजपचे आमदार आणि भाजपला समर्थन देणारे अपक्ष - 113
गुवाहाटीला असलेले अपक्ष आमदार - 10
बहुजन विकास आघाडी - 3
शेकाप - 1
देवेंद्र भुयार आणि संजयमामा शिंदे या दोन आमदारांचा पाठिंबा
एकूण - 129
अशी परिस्थिती निर्माण झाल्यास बहुमताचा आकडा 125 होईल.
 
आता महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहूया,
 
शिवसेना - 14
काँग्रेस - 44
राष्ट्रवादी काँग्रेस- 51
एकूण = 109
त्यामुळे सरकार कोसळण्याचे चिन्ह निर्माण होऊ शकतात.
 
'कॉम्पोझिट फ्लोअर टेस्ट' म्हणजे काय?
जेव्हा एकपेक्षा अधिक पक्ष सत्तास्थापनेचा दावा करतात, तेव्हा या प्रकारची फ्लोअर टेस्ट घेतली जाते. कोणाकडे बहुमत आहे हे स्पष्ट नसेल तर राज्यपाल सदनाचं विशेष अधिवेशन बोलावू शकतात. यावेळी होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावामध्ये कोणाकडे बहुमत आहे हे सिद्ध होऊ शकतं.
 
एकूण सदस्यांपैकी किती सदस्य सदनात उपस्थित आहेत आणि मतदान करणार आहेत यावर बहुमताचा आकडा ठरतो. म्हणजेच महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा आहे 145 आणि सदस्य संख्या आहे 288. पण समजा सभागृहातले 46 आमदार काही कारणाने अनुपस्थित राहिले किंवा त्यांनी मतदान न करता तटस्थ राहाण्याची भूमिका घेतली, तर बहुमताचा आकडा 23 ने कमी होईल.
 
'कॉम्पोझिट फ्लोअर टेस्ट'साठी दोन पद्धतीने मतदान घेतले जाऊ शकते. एक म्हणजे आवाजी मतदान ज्यात आमदार ओरडून आपलं मत कोणाला आहे ते सांगतात. तर दुसरं म्हणजे विभाजित मतदान. यात प्रत्येक सदस्य स्वतंत्र्यपणे मत नोंदवतो. हे मतदान इलेक्ट्रॉनिक यंत्र, चिठ्ठ्या किंवा बॅलेट पेपरवर घेतलं जातं.
 
ज्या पक्षाला बहुमत मिळेल ते सरकार स्थापन करतात. जर दोन्ही गटांना समसमान मतं मिळाली तर सदनाच्या अध्यक्षाला मतदान करण्याचा हक्क असतो.
 
प्रो-टेम अध्यक्ष म्हणजे काय?
प्रो-टेम अध्यक्ष म्हणजे सदनाच्या कामासाठी नेमलेला हंगामी अध्यक्ष. ज्यावेळेस विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका झाल्या असतील पण सदनाच्या अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवड झाली नसेल तर विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रो-टेम अध्यक्षाची निवड केली जाते.