गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (17:28 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे किती संपत्ती?

eknath shinde
"मला छोटा नातू आहे. फुल टाईमपास आहे. माझी ती संपत्ती आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान आपल्या भाषणात म्हटलं.
 
असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात जरी म्हणत असले तरी या 'संपत्ती'शिवाय त्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दिलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता किती आहे हे आपण जाणून घेऊया.
 
ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून 2004 पासून चार टर्म आमदार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जवळपास 35 वर्षांपूर्वी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
 
2019 विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडील संपत्तीची सविस्तर माहिती दिली आहे.
 
महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची एकूण जंगम मालमत्ता 97 लाख 14 हजार 710 रुपये आहे.
 
त्यांची स्थावर मालमत्ता 1 कोटी 27 लाख 58 हजार 655 रुपये आहे. खरेदी केल्यानंतर स्थावर मालमत्तेचा बांधकामाचा खर्च 1 कोटी 25 लाख रुपये एवढा आहे. याची चालू बाजार किंमत (2019) 4 कोटी 47 लाख 50 हजार रुपये आहे.
 
तसंच स्वसंपादित मालमत्ता 5 कोटी 44 लाख 64 हजार 710 रुपये आहे. तर एकनाथ शिंदे यांच्यावर बँक, वित्तीय संस्था, इतर यांच्याकडून घेतलेले 3 कोटी 20 लाख 64 हजार 195 रुपयांचं कर्ज आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्याकडे हातातील रोख रक्कम 2 लाख 64 हजार रुपये आहे.
 
सोनं, गाड्या आणि पिस्तूल
 
शिंदे कुटुंबाकडे 46 लाख 55 हजार 490 रुपयांच्या सात गाड्या आहेत. यापैकी एकनाथ शिंदे यांच्या नावावर 96 हजार 720 रुपयांची अर्माडा, 1 लाख 33 हजार रुपयांची स्कॉर्पीओ, 1 लाख 89 हजार 750 रुपयांची बोलेरो अशा तीन गाड्या आहेत.
 
तर पत्नी लता शिंदे यांच्या नावावर चार गाड्या आहेत. 27 लाख 31 हजार 80 रुपयांची इनोव्हा, 8 लाख 41 हजार 350 रुपयांची स्कॉर्पिओ, 6 लाख 42 हजार 230 रुपयांची इनोव्हा आणि 21 हजार 360 रुपयांचा टेम्पो त्यांच्या नावावर आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या नावावर एक रिव्हॉल्व्हर आणि एक पिस्तूल आहे. अडीच लाख रुपयांचं रिव्ह्लॉव्हर आणि सव्वा दोन लाख रुपयांची पिस्तूल असल्याचा उल्लेख त्यांच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.
 
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे 25 लाख 87 हजार 500 रुपयांचं सोनं आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे 4 लाख 75 हजार किमतीचं 11 तोळं सोनं आहे तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 21 लाख 75 रुपये किमतीचं 58 तोळं सोनं आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या नावावर 4 कोटी 47 लाख 50 हजार रुपयांची दोन घरं आणि महाबळेश्वर सातारा येथे काही शेतजमीन आहे.
 
उत्पन्नाचा स्त्रोत काय?
व्यवसाय किंवा नोकरीचा तपशील देताना एकनाथ शिंदे यांनी आपण शिवम एंटरप्रायजेसचे स्वत: मालक असल्याचे म्हटले आहे. तर शिंदे कन्स्ट्रक्शनच्या मालक त्यांच्या पत्नी लता शिंदे आहेत.
 
वेतन, घर मालमत्ता, कंत्राटदार, वाहतुकदार, व्याज उत्पन्न आणि इतर उत्पन्न हे उत्पन्नाचे स्त्रोत असल्याचाही उल्लेख आहे.
 
एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 13 लाख 47 हजार 756 रुपये आहे
 
तर स्थावर मालमत्ता 1 कोटी 23 लाख 59 हजार 975 रुपये आहे.
 
स्थावर मालमत्तेचा बांधकामाचा खर्च 1 कोटी 25 लाख रुपये आणि बाजार किंमत 4 कोटी 98 हजार रुपये आहे.
 
तसंच स्वसंपादित मालमत्ता 6 कोटी 11 लाख 47 हजार 756 रुपये आहे.
 
18 खटले प्रलंबित
एकनाथ शिंदे यांच्यावर 18 फौजदारी खटले प्रलंबित आहेत अशीही माहिती त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.
 
यापैकी काही केसेस सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, बेकायदेशीर जमाव करणे, लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकारच्या काही प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. परंतु या केसेस अद्याप सिद्ध झालेल्या नाहीत.
 
रिक्षावाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
राजकारणात येण्यापूर्वी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे. पण वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी राजकारणात कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला आणि 30-35 वर्षांनंतर आता ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले आहेत. तसंच एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
 
ठाण्यातील शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांना राजकारणाची दिशा मिळाली. 1997 मध्ये आनंद दिघेंनी शिंदेंना ठाणे महापालिकेचं तिकीट दिलं.
 
एकनाथ शिंदे हे गेली अनेक दशके ते शिवसेनेत संघटन वाढवणारे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.
 
आपल्या पहिल्याच प्रयत्नांत शिंदेंनी महापालिकेत बाजी मारली आणि ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. इथे सुद्धा पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.
 
2004 सालापासून सलग चार वेळा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेत.
 
शिंदे यांनी या आधी 2015 ते 2019 पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी सोपवली होती.
 
उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती?
यानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे ते सुद्धा पाहूया,
 
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता 24 कोटी 14 लाख इतकी आहे.
 
कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स - 21 कोटी 68 लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता 24 कोटी 14 लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.
 
उद्धव यांची स्थावर मालमत्ता 52 कोटी 54 लाख आहे.
 
उद्धव यांनी 1986 ते 1988 दरम्यान रायगड जिल्ह्यात 5 प्लॉट्स घेतले होते त्याची किंमत 95,000 आहे.
 
एका जागेवर त्यांचं फॉर्महाऊस आहे त्याची किंमत 5 कोटी रुपये आहे.
 
अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत - 4 कोटी 20 लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत - 13 कोटी 64 लाख इतकी आहे.