राजा उपाशी असताना घरात कसं बसणार, मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार-धैर्यशील माने
खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार धैर्यशील माने याठिकाणी आले होते.
"माझा राजा उपाशी आहे, अशावेळी असताना घरात कसा बसू. छत्रपतींच्या वंशजांचं कुटुंब उपाशी असणं हा काळा दिवस आहे," अशी प्रतिक्रिया माने यांनी यावेळी दिली.
सन्मानानं जगणं शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाची संकल्पना सांगणारे राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज उपोषणाला बसले असल्याचंही ते म्हणाले.
मी शिवसेनेचा खासदार म्हणून नव्हे तर छत्रपतींचा मावळा म्हणून पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचंही, खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी म्हटलं आहे.
छत्रपतींचं घराणं शौर्याची परंपरा देशाला घालून देणारं आहे. तुमच्या आशीर्वादनंच मी खासदार झालो. आपली ही भूमिका निश्चितपणे मंत्रिमंडळासमोर नेईल, मुख्यमंत्र्यांपर्यंत नेईल असंही धैर्यशील माने यांनी म्हटलं.