शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (22:47 IST)

पती उपचारासाठी, पत्नी वडिलांच्या सेवेसाठी गेलेली असताना चोरट्यांचा डल्ला

जळगाव शहरातील योगेश्वर नगरात राहणाऱ्या भोळे कुटुंबीयांच्या घरात डल्ला मारून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विकास भोळे हे उपचारासाठी पुणे येथे तर काजल भोळे या आपल्या वडिलांच्या सुश्रुषेसाठी प्रेमचंद नगरात गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली.
 
शहरातील जुने जळगावात असलेल्या योगेश्वर नगर परिसरात प्लॉट क्रमांक ५ मध्ये विकास चंद्रकांत भोळे हे पत्नी काजल व दोन मुलांसह राहतात. काही महिन्यांपूर्वी विकास यांचा अपघात झालेला असल्याने ते उपचारासाठी पुणे येथे ये-जा करतात. काजल यांचे वडील आजारी असल्याने त्या वडिलांची सुश्रुषा करण्यासाठी व रात्री झोपण्यासाठी प्रेमचंद नगर येथे जात असतात. विकास हे दि.१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता पुणे येथे गेले. काजल या रात्री ८.३० वाजता मुलांसह माहेरी गेल्या. गुरुवारी सकाळी मुलगा धवल हा सायकलने घरी आला असता त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला.
 
चोरट्यांनी भोळे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ७५ हजार रुपये रोख व सोने-चांदीचे दागिने असा २ लाख ४४ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनीपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी देखील पाहणी केली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कानसे या करीत आहेत.