रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 जानेवारी 2024 (20:49 IST)

आधी पतीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, अन् नंतर पत्नी स्वत: पोलीस ठाण्यात हजर, घटनेनंतर पोलिसही चक्रावले

crime
नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनाला कंटाळून एका पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याचे  धक्कादायक माहिती समोर आली आहे. या थराकाप उडवणाऱ्या घटनेमुळे नागपूर शहर हादरलं आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. पत्नीने रात्री पती निद्रावस्थेत असताना त्याच्या डोक्यावर दगडाने वार करून हत्या केली. रात्रभर पतीच्या मृतदेहासोबत राहिली त्यानंतर सकाळी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. पोलिसांनी पुढील तपासणी सुरु केली आहे.  
 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंनद भदूजी पाटील असं मृत पतीचे नाव आहे. अरूणा असं आरोपी पत्नीचे नाव आहे. आंनद हा मजुरीचे काम करीत होता. दारूचे व्यसन असल्याने तो मजूरीतून मिळालेल्या पैसांची दारू पियायचा. त्यामुळे घरात कौटुंबिक वाद व्हायचा. कधी कधी दारुच्या पैशासाठी पत्नीला मारहाण करायचा. याच गोष्टीला कंटाळून अरुणाने पतीचे हत्या केल्याचे समोर आले आहे.
 
दरम्यान शनिवारी त्याने दारूसाठी पत्नीकडे पैसे मागितले. पण तीने पैसे देण्यास नकार दिला. मात्र त्याने वाद घालून पत्नीला बुक्की बुक्कीने मारहाण केली. भांडणानंतर तो बाहेर गेला आणि रात्री दारू पिऊन घरी आला. त्यानंतर झोपला. मारहाण, भांडण, दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने मध्यरात्री पतीच्या डोक्यात भला मोठा दगड घातला. रक्ताच्या थारोळ्यात आणि जखमी अवस्थेत पडून राहिला.
 
दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर रविवारी सायंकाळी तिने कामठी पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली. या घटनेनंतर पोलिसही चक्रावले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला.या प्रकरणी पोलिसांनी अरुणावर हत्येचा गुन्हा दाखल करून घेतला आणि तिला अटक केली.