नाशिकरोड -पोलीस कर्मचाऱ्याच्या घराबाहेर बिबट्याने पहाटे केली पार्टी; जयभवानी रोड वरील घटना
नववर्षाच्या स्वागतसाठी सर्वत्र तयारी सुरु असतांना पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या दारात बिबट्याने ठाण मांडून पाळीव मांजर फस्त केली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शाम कोटमे हे जयभवानी रोड वरील चव्हाण मळा येथे शिवम बंगल्यात राहतात. रात्री त्यांच्याकडे पाहुणे आले, जेवण झाल्या नंतर बारा वाजेला सर्व झोपले. सकाळी योगा क्लास साठी जात असताना बंगल्याच्या मुख्य दारात मांजरीचे काही अवशेष आढळले. घरातील सिसिटीव्ही तपासले असता रात्री एक वाजून दहा मिनिटांनी बिबट्या एक पाळीव मांजरीला तोंडातधरून बंगल्याच्या मुख्य दारात आला.
तेथे जवळपास अर्धा तास बसून मांजरीला फस्त केले आणि पुढच्या दिशेने रवाना झाला. बंगल्यातून बाहेर पडताना बिबटयाला बाहेर कुत्रे असल्याचे समजले. मात्र त्यावर सावज राहून हल्ला करण्याच्या तयारीत असताना कुत्र्यांनी तेथून पळ काढला. कोटमे यांनी सांगितले कि, या ठिकाणी बिबटयाचा वावर आहे. अनेक मांजरी या ठिकाणी होत्या मात्र त्या कमी होताना दिसत आहे. वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी त्यांनी केली.
पोलीस कर्मचारी शाम कोटमे यांचे सालक राहुल कुशारे यांनी वन अधिकारी अनिल अहिरराव यांच्या सोबत संपर्क साधला. घटना स्थळाची पाहणी करून पिंजरा लावला जाईल, मात्र रहिवासी यांनी रात्री पहाटे काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
Edited by -Ratnadeep Ranshoor