1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (21:44 IST)

माझा अंदाज चुकला म्हणून मी माफी मागायला आलो आहे : शरद पवार

माझा अंदाज चुकला म्हणून मी माफी मागायला आलो आहे. नाशिकमध्ये अनेकजणांनी साथ दिली परंतु कोणी सोडून गेले नाही. मात्र माझा अंदाज एकवेळला चुकला असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातून मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाण साधला आहे. नाशिकमधील  येवलाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी भुजबळांचे नाव न घेता पवारांनी टोले लगावले. 
 
शरद पवारांनी थेट नाशिककरांची माफी मागितली आहे. भुजबळांना निवडण्याचा माझा अंदाज चुकला. तुम्ही मी सांगितल्यामुळे विचारधारेवर मतदान केलं यामुळे मी तुमची माफी मागतो असे पवार म्हणाले. दरम्यान नाव न घेता पवारांनी छगन भुजबळांवर चांगलीच टीका केली आहे. पवार म्हणाले. बऱ्याच काळानंतर माझे इथे येणं झालंय एक काळ असा होता की, नाशिक जिल्ह्यात आल्यावर पहिली चक्कर इथे असायची. आमचे अनेक सहकारी होते. राजकारणात चढ उतार झाला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. अंबादास बनकर, कल्याणराव पाटील, जनार्दन बंधू यांची आठवण येते. या सगळ्यांसोबत एका कालखंडात काम करण्याची संधी मिळाली.
 
शरद पवार पुढे म्हणाले की, अलिकडे जबाबदाऱ्या वाढल्या आणि येणं कमी झाले. देश पातळीवर काम करण्याची स्थिती आली आणि त्यामुळे इथे येणं कमी झाले. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्याने गेल्या अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. त्या जिल्ह्याचा उल्लेख करायचा असेल तर एक नंबरच्या जिल्ह्याचे नाव नाशिक आहे. या नाशिकमधला माणूस कष्टकरी शेतकरी असेल, अदिवासी असेल, दुष्काळीभागातील असेल त्याने कधी साथ सोडली नाही. त्यामुळे आपण विचार केला की दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांना अनेक जनतेच्या समोर यश मिळवता आले नाही.
 
महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचे असेल तर भक्कम विश्वासाचा मतदारसंघ लागतो. म्हणून आम्ही येवल्याची निवड केली. मगाशी काही वक्त्यांनी सांगितले पवारांनी नाव दिले आणि त्यांना आम्ही निवडून दिले. ३ ते ४ वेळा निवडून दिले. नाव कधी चुकले नाही पण एका नावाने घोटाळा झाला. त्यासाठी आम्ही स्वत: आलोय. पण कोणाचे कौतुक आणि टीका करण्यासाठी नाही तर मी माफी मागायला आलो आहे. मी माफी यासाठी मागतो आहे. कारण माझा अंदाज चुकत नाही पण इथे चुकला. माझ्या विचारावर तुम्ही निकाल दिला आणि त्यामुळे तुम्हाला यातना झाला. तुम्हालापण यातना झाल्या असतील तर माझं कर्तव्य आहे की तुमची माफी मागितली पाहिजे.
 
यावेळी शरद पवारांनी विरोधकांना इशारा सुद्धा दिला आहे. तसेच जनतेला पुन्हा चुक होणार नाही असे सांगितले आहे. कधीकाळी लोकांच्या समोर जाण्याची वेळ येईल. महिना, वर्षात ती वेळ येईल आणि पुन्हा इथे येईल. तेव्हा चुक करणार नाही. योग्य निकाल सांगेल. तेव्हा पुन्हा साथ मिळवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor