1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (21:36 IST)

पुन्हा एकदा शरद पवार पावसात ओलेचिंब

राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवार यांनी नऊ आमदारांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते येवल्यातून महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत असून आज येवल्यात पहिली जाहीर सभा झाली. या सभेला जाताना पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळालं.
 
त्यामुळे शरद पवार येवला दौऱ्यावर असताना पुन्हा एकदा सातारा सभेची आठवण ताजी झाली . सभास्थळाकडे जात असताना पावसाने हजेरी लावली. या पावसातच शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेत असताना पावसात भिजल्याचा फोटो समोर आला आहे. भिजलेल्या अवस्थेत गाडीत बसले असतानाचा पवारांचा फोटो राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
राज्याच्या राजकारणात सन 2019 विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सातारा येथे शरद पवारांनी कोसळत्या पावसात सभा घेतली होती. ती सभा प्रचंड गाजली होती. पवारांचं पावसात भीजत केलेलं भाषण ऐतिहासिक ठरलं. पावसातही सभेचा व्हीडिओ पुढे कित्येक दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत होता. आताही असाच प्रसंग समोर आला असून येवला येथील सभेच्या ठिकाणी जात असताना पाऊस सुरु झाला. या पावसातच शरद पवार स्थानिक नेते कार्यकर्त्यांना भेटत होते. यामुळे ते पावसात भिजले. त्यांचा तो फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्या सोशल हँडलवर शायराना कॅप्शनसह शेअर केला आहे. त्यामुळे काही मिनिटांतच तो व्हायरल झाला आहे.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून फोटो ट्विट
दरम्यान पावसात भिजलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सुरवातीला राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी हा फोटो ट्विट केला आहे. “भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं ना थका हूँ ना हारा हूँ रण में अटल तक खडा हूॅं मैं” अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळेंनी फोटो शेअर केला आहे.


तर रोहित पवार यांनी ‘मैं पत्थर पर लिखी इबारत हूँ…शीशे से कब तक तोड़ोगे… मिटने वाला मैं नाम नहीं… तुम मुझको कब तक रोकोगे….असे लिहित शरद पवार यांचा फोटो पोस्ट केला आहे.

तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेरे हर एक वार का पलटवार हू….असे कॅप्शन दिले आहे. तर“ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची! असे कॅप्शन दिले आहे.


Edited By - Ratnadeep Ranshoor