मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 एप्रिल 2021 (21:36 IST)

माझ्यावर खंडणी गोळा करण्याचे संस्कार नाहीत : अनिल परब

सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांशी माझा काहीएक संबंध नसून माझी, मुख्यमंत्र्यांची तसंच सरकारची बदनामी करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहेत. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असून नार्को टेस्ट देण्याचीही माझी तयारी आहे, असं म्हणत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
 
अनिल परब यांनी बुधवारी (7 एप्रिल) पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणी होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलं.
 
 
काय म्हणाले अनिल परब?
"SBVT च्या ट्रस्टींकडून 50 कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं तसंच जानेवारी 2021 ला मी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांना बोलावून प्रत्येक कंत्राटदाराकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं, असे दोन आरोप माझ्यावर सचिन वाझे यांनी एका पत्रात केले आहेत. हे दोन्ही आरोप मी फेटाळून लावत आहे," असं परब म्हणाले.
 
"माझ्यावर खंडणीचे संस्कार नाहीत. मी बाळासाहेब ठाकरे यांची आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की हे आरोप खोटे आहेत. मला नाहक बदनाम करण्यासाठी हे आरोप करण्यात येत आहे."
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजप नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आणखी तिसरा बळी घेऊ, असं ओरडून सांगत होते. याचा अर्थ त्यांना या पत्राची कल्पना कदाचित त्यांना आधीपासूनच होती, असंही अनिल परब यांनी म्हटलं.
 
अनिल परब यांनी म्हटलं की, माझ्यावर करण्यात आलेल्या दोन आरोपांशी माझा काहीएक संबंध नाही. महानगरपालिकेच्या कोणत्याही कंत्राटदारांशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला मी सामोरं जायला तयार आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच.
 
"सचिन वाझेंच्या आरोपांनुसार मी त्याला जूनमध्ये याबाबत सांगितलं होतं. पण त्याने आतापर्यंत याबाबत कधीच काही तक्रार केली नाही. परमबीर सिंगांच्या पत्रातही याबाबत उल्लेख नाही.
 
मी CBI, NIA, RAW किंवा कोणत्याही चौकशीला तयार आहे. हे प्रकरण वेगवेगळ्या दिशांना नेण्याचं काम सुरू आहे. नार्को टेस्ट देण्याचीही माझी तयारी आहे," असं अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
 
काय आहेत सचिन वाझेंचे आरोप?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सध्या NIA कोठडीत असलेले निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी NIA ला पत्र लिहिल्याचं वृत्त आहे.
 
वाझे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले्या या कथित पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही काही आरोप केले आहेत.
 
अनिल परब यांनी स्वतःच पत्रकार परिषदेत या आरोपांचा उल्लेख केला आणि आपण अशी कोणतीही मागणी केली नसल्याचंही स्पष्ट केलं.