शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (15:26 IST)

तृतीयपंथींना समाजकल्याण खात्याच्या वतीने ओळखपत्र दिले जाणार

तृतीयपंथींना समाजप्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी समाजकल्याण खात्याच्या वतीने त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.
 
तृतीयपंथी हा एक सामाजिक घटक असून, त्यांच्याही हक्काचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू झाली आहे.योजना राबविण्यासाठी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तृतीयंपथीयांचे कल्याण व हक्कांचे संरक्षण अंतर्गत नाशिक विभागातील पाच ही जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी ओळखपत्र मिळविण्यासाठी ’नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या वेबसाईटला भेट देवून अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाचे सदस्य सचिव तथा नाशिक समाज कल्याण विभागचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांनी केले आहे.
 
सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार, यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन (National Portal For Transgender Persons) किंवा https://transgender.dosje.gov.in/Applicant/Login/Index या लिंक वर भेट देऊन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व माहिती भरावी. ऑनलाईन अर्जासोबत आयकार्ड साईज फोटो, स्कॅन केलेली सही,आपण तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, शासकीय रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ यांनी दिलेला अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करावीत, असेही भगवान वीर यांनी सांगितले आहे.