बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (08:21 IST)

नाशिक: सराफ व्यावसायिकाचे अपहरण करत तलवारीचा धाक दाखवून ७ लाख लुटले

सराफ व्यावसायिकाचा पाठलाग करत दुचाकीवरून त्याचे अपहरण करण्यात आले व जंगलात नेऊन तलवारीचा धाक दाखवत त्याच्याकडून दुकानाची चावी हस्तगत करून दुकानातील सोन्याचे दागिने आणि रक्कम असा सात लाखांचा ऐवज लुटण्याचा धक्कादायक प्रकार मुंबई-आग्रारोडवरील स्वराजनगर परिसरातील जंगलात उघडकीस आला.
 
या लुटारूंनी सराफाला बंधक बनवत दुकानातील दागिने लुटून नेल्याची तक्रार सराफ व्यावसायिकाने पोलिसांत दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि संजय बेरा (रा.गणेशवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,अंबड येथील सराफी दुकानातून दुचाकीने घरी जात असताना अनोळखी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या तीन संशयितांनी दुचाकी थांबवली.बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसवून ओरडल्यास ठार मारण्याची धमकी देत स्वराजनगर परिसरातील जंगलात घेऊन गेले.जंगलात दाट झाडीत नेऊन तलवारीचा धाक दाखवत तलवारीच्या मागील बाजूने मारहाण केली.खिशातील रक्कम आणि बॅगमधील ३२ ग्रॅम वजनाचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.
 
एका संशयिताने खिशातून दुकानाची चावी घेत दोघांनी तेथेच बंधक बनवत एक चावी घेऊन दुचाकीने दुकानात गेला व दुकानात विक्रीसाठी ठेवलेले ७२.५ ग्रॅमचे दागिने लुटले. याबाबत पोलिसांत तक्रार केली तर तुला मारून टाकू अशी धमकी देत दुचाकीवरून निघून गेले. बेरा यांनी काही नागरिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.