महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार – अमित देशमुख
मुंबई ही देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असून आज मुंबईत सिनेमा,नाटक, जाहिराती,मालिका, ॲनिमेशन, लोककला या सर्व कला प्रकारांमध्ये दररोज वेगवेगळे प्रयोग होत असतात.या सर्व कलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि आपली कलाकृती सादर करण्याची संधी मिळावी याकरिता या नवनिर्मिती करणाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्रात जागतिक दर्जाचे सिनेमा आणि करमणूक केंद्र (इनक्युबेशन सेंटर) उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ यांच्यामार्फत मराठी पटकथा लेखन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ऑनलाईन पद्धतीने सहभागी होताना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी करमणूक क्षेत्राला उभारी देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये अभिनेते सुबोध भावे,आदिनाथ कोठारे यांच्यासह या शिबिरासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक निवडण्यात आलेले लेखक आणि दिग्दर्शक गिरिष जोशी, निर्माते उमेश कुलकर्णी, लेखिका केतकी पंडित उपस्थित होते.
या शिबिरामध्ये बोलताना देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात कलाकारांमध्ये असलेली प्रतिभा लोकांसमोर यावी यासाठीच करमणूक इन्क्युबेशन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सिनेमा बनविण्यासाठी आधी कथा आणि नंतर पटकथा तितकीच ताकदीची लागते आणि त्यामुळे हे शिबिर नवीन पटकथा लेखकांना महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास वाटतो. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून पटकथा लेखनासाठी विशेष शिबिर घेण्यात आले याचा आनंद असून नवीन पटकथा लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: एक चांगले छायाचित्रकार असून त्यांची कला सर्वश्रुत आहे.महाराष्ट्रातील कलाकारांविषयी तसेच नाटक,सिनेमा,साहित्य,लोककला हे सर्व त्यांच्या ह्दयाजवळ असल्यानेच या क्षेत्रातील कलाकारांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील 56 हजार कलाकारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर लवकरच या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा म्हणूनही शासन प्रयत्नशील असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.