गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (10:41 IST)

महिलेवर हात उगारला तर हात तोडून हातात देईन-सुप्रिया सुळे

पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे भडकल्या आहेत. महागाईच्या मुद्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या भेटीचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांवर पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हात उगारला. पक्ष किंवा राजकीय विचार काहीही असो; पण महिलांचा अवमान कोणत्याच परिस्थितीत सहन करणार नाही. कुठल्याही पक्षाच्या महिलेवर हात उगारला तर हात तोडून त्याच्या हातात देईन, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी महागाई विरोधात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
 
भाजपच्या एका नेत्याने महिलेवर हात उगारला. ही आपली संस्कृती आहे का? यापुढे जर असा कुठेही प्रकार झाला तर आपण स्वत: पुढे येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. ही प्रवृत्ती कुठेतरी थांबायला हवी. कायद्याने आपण न्याय मागणार आहोत. जोपर्यंत त्या तिघांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, असं त्या पुढे म्हणाल्या.
 
भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपने महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्यास पक्षातून बाहेर काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर बोलताना सांगितलं की, असं कृत्य महाराष्ट्रात कधीही झालं नाही. मात्र महाराष्ट्रात असं कृत्य भाजपने केलं आहे. भाजपकडून महिलांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना शिकवू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, काल महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला, पुन्हा उगारू नका, कारण आता अती झालं आहे. अन्यथा या लोकांचे घरातून बाहेर पडण्याचे वांदे होतील असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.
 
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बेटी बचाव बेटी पढाव ही संस्कृती सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का? माझ्या महिला कार्यकर्त्याने चुक केली असती तर मी स्वतः स्मृती इराणी यांची माफी मागितली असती. त्यांना माफी मागण्यामध्ये काही कमीपणा नव्हता. जे चूक आहे ते चूक आहे, मात्र एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो हाच यांचा पुरुषार्थ आहे का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.