सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (08:45 IST)

“ठाकरे सरकारला तसं वाटत नसेल तर हे दुर्दैव”; बेळगावच्या मुद्द्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले

कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषिकांबाबत सातत्याने अन्यायाची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेत मराठी भाषिकांची संख्या कमी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बेळगावात फक्त १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारनं काढला आहे. यावर सीमाभागातील मराठी भाषिकांचा लढा कमजोर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच याविरोधात आपल्याला कोर्टात जावं लागेल, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे. कर्नाटक राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी भाषिक जनगणना करण्यात आली होती. त्या भाषिक जनगणनेत १५ टक्के मराठी भाषिक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. कर्नाटक सरकारने केलेल्या भाषिक जनगणनेचा या अजब निष्कर्षामुळं मराठी भाषिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
 
“बेळगावमध्ये ६० टक्के ते ६५ टक्के मराठी बांधव आहेत आणि आजही ती संख्या तेवढीत आहे फक्त कर्नाटकने राजकीय स्वार्थसाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण करून मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे. बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असला तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मतं ही भाजपापेक्षा जास्त आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजपा सत्तेवर आला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत असे म्हणत असतील तर ते अत्यंत खोट आहे. याच्यामागे काहीतरी डाव आहे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार गप्प का बसलंय हे मला कळत नाही. राज्य सरकारने सीमाभागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन चर्चा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भात पाऊल टाकावं वाटत नसेल तर हे दुर्दैव आहे. मी मुख्यमंत्र्यांशी याविषयावर बोलेन,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
 
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत जोरदार मुसंडी मारली. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीचा मात्र मोठा पराभव झाला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. कर्नाटकासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपाने बहुतमतात असल्याचे दाखवून दिले. भाजपाने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि जोरदार प्रचार केला होता. ५८ प्रभागांच्या बेळगाव महापालिकेसाठी ३८५ उमेदवार रिंगणात उभे होते. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं होतं.