एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको - उद्धव ठाकरे
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत उत्तर भारतीयांसोबत बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी उत्तर भारतीयांच्या पाठिंब्यासाठी आवाहन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी आज तुमची साथ मागायला आलो आहे. तुम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहता. तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. हा मेळावा नाही, बैठक आहे. मेळाव्यासाठी मैदान अपुरं पडेल. मी आपलं नातं मजबूत करण्यासाठी आलो आहे. आपण एकमेकांना हिंदू मानत असू, तर उत्तर भारतीय आणि मराठी वेगळे व्हायला नको,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. ते पुढे म्हणतात, 'गेल्या 25-30 वर्षांपासून आमची युती होती, आम्ही निभावली पण त्यांनी तोडली. आमची त्या पक्षासोबत आपुलकी होती, पण ते वर जाऊन बसले आणि त्यांनी आम्हाला दूर केले. 95 पूर्वी शिवसेना आणि भाजपला कुणी साथ देत नव्हते, आमच्यावर धार्मिक असल्याचा ठपका होता. तेव्हा माझ्या वडिलांनी तत्कालीन पंतप्रधनांना पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांनी कधीच उत्तर भारतीयांचा किंवा मुस्लिमांचा द्वेष केला नाही. जो देशाच्या विरोधात होता, त्यालाच बाळासाहेबांनी विरोध केला.'
Edited by : Ratnadeep Ranshoor