सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (13:27 IST)

पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात एकूण १६ वरिष्ठांची टीम कुटूंबाला २५ लाखांची मदत - देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
विरोधी पक्ष नेत अजित पवार यांच्याकडून पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्रकारावर झालेला हा हल्ला हा लोकशाहीला घातक आहे. पत्रकारितेला धोक्यात आणणारं आहे.” यानंतर बोलताना अजित पवार यांनी एक पत्रक दाखवत प्रश्न उपस्थित केले आहेत. “स्वप्न सत्यात उतरणार, रिफायनरी कोकणातच होणार, कोकणातील हजारो तरूणांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळणार, धन्यवाद एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंढरीनाथ आंबेकर ग्रीन रिफायनरी समर्थक”, अशा आशयाचं हे पत्रक आहे. तसंच या पत्रकात दिलेले वरिष्ठ नेत्यांचे फोटो पाहून त्यांचा या प्रकरणातील आरोपीशी काही जवळचे संबंध आहेत का? अशा शंकेला वाव मिळतो. हे पत्रक दाखवत अजित पवार यांनी असे नीच कृत्य करणाऱ्यांवर आळा घातला पाहिजे, अशी मागणी केलीय. तसंच वारिसे प्रकरणात एसआयटी तपासावर दबाव आणू नका, पोलीस यंत्रणांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको असा खोचक सल्ला देखील यावेळी अजित पवार यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीसांना तपासात ‘फ्री हॅण्ड’ देण्यात येईल का असा सवाल उपस्थित केला. पत्रकार वारिसे यांच्या हत्येच्या मागचा मास्टरमाईंड नक्की कोण आहे हे देखील लवकरात लवकर उघड करावं, असं देखील अजित पवार म्हणाले.
 
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणातील आरोपीने असे बॅनर्स लावले होते, हे आमच्याही निदर्शनास आले असल्याचं मान्य केलं. परंतू या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाव पोलिसांवर नाही. या प्रकरणी आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. या नीच कृत्याबाबत आरोपीला पूर्ण शिक्षा झाली पाहिजे, यासाठी हा खटला आम्ही फास्ट कोर्टात नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसंच कोकणातच रिफायनरी सुरू करायची आहे, देशातलं नव्हे एशियातला सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मदत मिळणार आहे.” असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणात एकूण १६ वरिष्ठांची टीम काम करत आहे. तसंच वारिशे कुटूंबाला २५ लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर वारिशे कुटूंबाला ही मदत २५ लाख ऐवजी १ कोटी देण्यात यावी, अशी मागणी राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजनी साळवी यांनी केलीय.
Edited by : Ratnadeep Ranshoor