गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 मे 2022 (21:57 IST)

इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत; 'त्या' वक्तव्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

indorikar maharaj
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज  पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने अडचणीत आले आहेत. पुण्यातील (Pune) दोन जणांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. याविषयी राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील, असं म्हटल्याचं वाकचौरे व भोसले यांचं म्हणणं आहे.
 
राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे याप्रकरणाचे निवेदन व तक्रार दिली. इंदुरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली.
 
तक्रारीची गंभीर दखल घेऊन आयुक्त ओम प्रकाश यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलीस अधीक्षकांना केली आहे. आसपास विचारणा करावी व दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असा आदेशही त्यात देशमुख यांनी दिला आहे.