परराज्यातील लोक येऊन कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता
मुंबई :मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेने आजपर्यंत (दि.4) अल्टीमेटम दिला आहे. भोंगे हटवले नाहीत तर राज्यभरात आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान, राज्यातील वातावरण बिघडवण्यासाठी परराज्यातील लोक येऊ शकतात, अशी शक्यता गृहविभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परराज्यामधील काही लोक महाराष्ट्रात येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं गृह विभागाने सांगितलं आहे. यासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करु नका, असे आदेश या नोटीसांमध्ये देण्यात आले आहेत. राज्यभरात एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. तसेच राज्यात शांतता, सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं, असं जनतेला आवाहन करण्यात आलं आहे.