1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 17 जानेवारी 2023 (14:31 IST)

जिंदाल कंपनी मधील दुर्घटनेची चौकशी प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात

fire jindal
इगतपुरी येथील जिंदाल कंपनी मधील दुर्घटनेची चाैकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने प्राथमिक निष्कर्षात सदरची घटना अपघात असल्याचे सांगितले आहे. दुर्घटनेतील जखमी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविण्याचे काम समितीकडून केले जात आहे. या आठ दिवसांत त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली.
 
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी (दि. १) जिंदाल पॉलिफिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आग दुर्घटना घडली होती. यामध्ये दोन महिलांसह तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर २२ कामगार जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय समितीकडून चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी समिती नेमली. सदर समितीने चौकशी सुरू केली असून, या अपघातात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांशी समितीने चर्चा केली. दुर्घटना घडली तेव्हा आणि त्याआधी काही वेळापूर्वी नेमके काय घडले याची सविस्तर माहिती कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येत आहे. तसेच समितीने कंपनी व्यवस्थापन आणि लेबर कॉन्ट्रॅक्टरकडील अहवाल पडताळणीसाठी घेण्यात आले आहेत. या अहवालांच्या पडताळणीनंतर आठवडाभरात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पारधे यांनी दिली आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor