शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 एप्रिल 2023 (19:32 IST)

राष्ट्रवादीकडून जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री? अमोल कोल्हेंच्या विधानानंतर चर्चेला उधाण

Jayant Patil
प्राजक्ता पोळ
 "माझ्यासारखा कार्यकर्ता आजही आदर्श मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांच्याकडे पाहतो."
 
राजारामबापू साखर कारखान्याचे नवनिर्वाचित चेअरमन आणि जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या सत्कार समारंभात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हे वक्तव्य केलं.
 
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारासाठी कधी अजित पवारांचे बॅनर लावले जात आहेत, कधी सुप्रिया सुळे यांचे बॅनर लावले जात आहेत, तर कधी जयंत पाटील यांना आदर्श मुख्यमंत्री संबोधलं जात आहे.
 
महाविकास आघाडीमधल्या तीन पक्षांपैकी फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात ही चढाओढ का सुरू झाली आहे? अजित पवार विरुद्ध जयंत पाटील असा सुप्त संघर्ष यातून समोर येतोय का? याबाबतचा हा आढावा.
 
राजारामबापू सहकारी साखर साखर कारखान्याच्या चेअरमनपदी जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांची नियुक्ती झाली.
 
प्रतीक पाटील यांचा सत्कार खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी भाषणात बोलताना कोल्हे म्हणाले, “शिवराज्य यात्रेची संपूर्ण आखणी सुरू असताना मी प्रतीक पाटील यांना बघायचो. त्यांना कार्यालयात किंवा घरी भेटायचो.
 
"त्यावेळी सुसंस्कृत घरातील व्यक्ती काय असते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्रतीकदादा आणि राजवर्धन दादा. कुठेही अवाजवी सांगणं नाही. काहीतरी विचारल्याशिवाय बोलणं नाही. हे पाहत असताना एक गोष्ट जाणवली, नेत्यांची मुलं हेकेखोर असतात हे अनेकदा पाहायला मिळतं," असं कोल्हे म्हणाले.
 
"जयंत पाटील हे राज्याचे सर्वाधिक वेळा अर्थमंत्रिपद भूषवलेला नेते आहेत,
 
"आजही माझ्यासारखा कार्यकर्ता जयंत पाटील यांच्याकडे आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो अशा कर्तुत्वसंपन्न पिता असताना त्याचा माज नाही. जबाबदारीचं भान असणाऱ्यांपैकी मी प्रतीक पाटील यांच्याकडे पाहतो," असं कोल्हे म्हणाले.
 
प्रतिक पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळत असताना कोल्हे यांनी त्यांच्या मनातील आदर्श मुख्यमंत्री जयंत पाटील असल्याचं सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत आता अजित पवारांबरोबर जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
 
अजित पवारांच्या नावाची बॅनरबाजी
राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असताना सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंना पर्याय म्हणून अजित पवार भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं.
 
पण या चर्चा खोट्या असल्याचं अजित पवार यांनीच माध्यमांसमोर सांगितलं.
 
पण त्यानंतर सकाळ समूहाच्या कार्यक्रमात अजित पवार यांना 2024 ला मुख्यमंत्री बनायला आवडेल का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “2024 ला कशाला... आत्ता म्हटलं तरी मुख्यमंत्री व्हायला आवडेल”.
 
ही इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवल्यावर कार्यकर्यांकडून त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावायला सुरूवात झाली.
 
काही कार्यकर्त्यांनी ‘दादा मुख्यमंत्री झाले तर?’ अमली पदार्थांचा व्यापार बंद करतील. प्लास्टिकवर बंदी आणतील असा जाहिरनामा असलेले पोस्टर्स लावले.
 
त्याचबरोबर अजित पवार यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तेर गावच्या ग्रामस्थांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा घातली.
 
महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि कॉंग्रेस शांत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीसाठी चढाओढ बघायला मिळत आहे.
 
जयंत पाटलांबाबतचं विधान हे अजित पवारांच्या चर्चांना दिलेलं उत्तर?
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नेत्यांच्या गटबाजीबद्दल राजकीय वर्तुळात अनेकदा बोललं जातं.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामधल्या सुप्त संघर्षाबाबत सत्ताधारी पक्षाकडून अनेकदा भाष्य केलं गेलं.
 
विरोधी पक्षनेतेपदासाठीही अजित पवार आणि जयंत पाटील या नावांची चर्चा होती. अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर फडणवीसांसमोर जयंत पाटील विरोधी पक्षनेते म्हणून योग्य असल्याचं काही आमदारांकडून खासगीत सांगितलं जात होतं. पण या स्पर्धेत विरोधी पक्षनेते पदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली.
 
मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना या संघर्षावरून टोला लगावला होता.
 
शिंदे अजित पवारांना म्हणाले, “आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणता, मग तुम्ही काय घटनाबाह्य सरकारचे घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? एकतर त्या खुर्चीवर जयंतरावांची बसण्याची इच्छा होती. तिथे तुम्ही बसलात …”
 
त्यावर अजित पवार उठले आणि हसत म्हणाले, “जयंतराव या माझ्या खुर्चीवर बसा…”
 
त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधीवेळी जयंत पाटील यांना सांगितलं असतं तर ती खेळी यशस्वी झाली असती असा एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना टोमणा मारला होता. त्यामुळे अजित पवार विरूद्ध जयंत पाटील या सुप्त संघर्षाबद्दल अनेकदा राजकीय टोलेबाजी केली जाते.
 
कार्यकर्त्यांना खरंच समज दिली जाते का?
यामुळे अजित पवारांचं नाव भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत आल्यानंतर जयंत पाटील यांचं आदर्श मुख्यमंत्री नाव घेतलं गेलं का हा प्रश्न उपस्थित होतो.
 
जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, “राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सगळं आलबेल आहे असं नाही. जे नेते मुख्यमंत्री होऊ शकतात त्यांना या गोष्टी करण्याची गरज नसते. पण ज्यांना भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी चर्चेत राहिलं पाहिजे असं वाटतं ते असं करतात.
 
"मुळात कार्यकर्ते जेव्हा असे बॅनर लावतात तेव्हा दादा चिडले वगैरे असं म्हटलं जातं पण प्रत्यक्षात कुठल्या कार्यकर्त्याला समज दिली जात नाही. ते नेतेही चर्चेत राहतात. त्यामुळे जबरदस्ती दिलेल्या शुभेच्छाही चालतात असं आहे.
 
"पण सध्याच्या परिस्थितीत नेत्यांकडून ही विधानं केली जात असली तरी त्याला फारसा अर्थ आहे असं वाटत नाही. सध्या लगेच विधानसभेची निवडणूक नाही. जरी शिंदेंचं मुख्यमंत्रिपद गेलं तरी त्याचा महाविकास आघाडीशी थेट संबंध नाही. आताची विधानं ही चर्चेसाठीच केली जात आहेत असं वाटतं."
 
हे विधान ठरवून केलेलं असावं, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नेतृत्वाच्या चढाओढीमध्ये हे भाष्य केलं असावं असं काही विश्लेषकांना वाटतं.
 
याबाबत जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "महाराष्ट्राच्या राजकारणात कारण नसताना काही विषय चर्चिले जात आहेत. जयंत पाटील हे आदर्श मुख्यमंत्री आहेत हे वक्तव्य म्हणजे अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेला उत्तर आहे असं मला वाटतं. त्यात पवारांनी भाकरी फिरवली पाहिजे असं वक्तव्य करणं म्हणजे ठाराविक व्यक्तीकडे नेतृत्व राहणं याला छेद देण्यासाठी ते केलेलं असावं."

Published By -Smita Joshi