1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (08:34 IST)

भाजप कर्नाटकात केलेल्या चुका महाराष्ट्रात करत आहे का?

Is the BJP making the same mistakes it did in Karnataka in Maharashtra अगदी स्पष्ट आहे. भाजपने महाराष्ट्रात जो काही राजकीय उत्पात घडवला आहे त्याने खरे तर त्यांचा बराच लाभ व्हायला पाहिजे.
 
अगोदरच गेल्या दशकात महाराष्ट्रात नंबर एक बनलेला भाजप आता इतर पक्षांना अजून खुजे बनवणार असे खरे तर व्हायला पाहिजे. तसेच अपेक्षित आहे. गाडी पुढेच जायला पाहिजे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या पासंगाला पुरणार असं कोणीह साऱ्या देशभरात उरलेला नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून करण्यात आलेला आहे.
 
बंगळुरूमधल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीअगोदर लगबगीने हे करण्यात भाजपचा 'बुलडोझर' यशस्वी ठरला आहे यात तिळमात्र शंका नाही.
 
पण एव्हढे करून प्रत्यक्षात भाजपच्या हाती काय लागले याचा शांतपणे विचार केला तर मोदी-शहांनी सेल्फ-गोल तर केला नाही ना अशी पाल चुकचुकल्याशिवाय राहणार नाही.
 
सत्ताधारी पक्षात सध्या ज्याप्रकारचे नेतृत्व आहे त्यामुळे कोणी जाहीर आत्ममंथन अजिबात करणार नाही हे खरे आहे. पण जो कोणी हे करेल तो कदाचित
 
महाराष्ट्रातील 'येडियुरप्पा' कोण?
भाजपला चिंता करायला लावणारी कारणे अनेक आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे मोदी-शाह यांनी कर्नाटकमधील चुकाच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात केलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे स्वतःच्याच स्थानिक नेतृत्वाला जणू जाणूनबुजून अथवा अजाणतेपणे खच्ची करणे.
 
कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने भाजपने त्याचे राज्यातील एकमेव तालेवार नेते येड्डीयुरप्पा यांना 'खाली' बसवले त्यादिवशी भाजपदेखील खालीच बसली.
 
येड्डीयुरप्पा यांच्यामागे मुख्यमंत्रीपद सोडण्यासाठी एकप्रकारे प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष ससेमिराच लावण्यात आला होता.
 
कोणाला आवडो किंवा नावडो पण केंद्रीय नेतृत्वाला येड्डीयुरप्पा यांचे प्रस्थ कधीच आवडले नव्हते. त्याकाळात येड्डीयुरपा यांच्या दिल्ली भेटी वाढत होत्या आणि राज्यात त्यांचे विरोधक प्रबळ होत होते असे चित्र दिसू लागले होते.
 
महाराष्ट्रातील 'येड्डीयुरप्पा' हे नितीन गडकरी आहेत आणि बऱ्याच प्रमाणात देवेंद्र फडणवीस देखील आहेत. इतर लहानथोर मंडळी तर असंख्य.
 
मोदींच्या राष्ट्रीय स्तरावर उदय होण्यापूर्वी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे नेते म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले गडकरी आणि पक्षाचा ओबीसी चेहरा राहिलेले गोपीनाथ मुंडे. मुंडे हे 2014 ला केंद्रात मंत्री झाले आणि दुर्दैवाने लागलीच त्यांचे निधनही झाले..
 
उरले ते गडकरी. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2014मध्ये विधानसभा निवडणूक झालयावर मुख्यमंत्री म्हणून खरे तर गडकरी यांचा मान होता. पण ही भाजप अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची राहिली नव्हती.
 
गडकरी डोईजड होतील म्हणून त्यांचा पत्ता अलगद कापला गेला. त्यांच्या घरी नवनिर्वाचित आमदारांची गर्दी बघून दिल्ली सावध झाली.
 
एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील बसवराज बोम्मई?
नागपूरातूनच दोन टर्म आमदार राहिलेले प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर श्रेष्ठींची मर्जी आली. पुढे काय घडले हा ताजा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि 'मी पुन्हा येणार' हे त्यांनी निवडणूकीत ठणकावून सांगितले.
 
पुढे घडले ते वेगळेच. वर्षांपूर्वी फडणवीस परतले ते उपमुख्यमंत्री म्हणून. आक्रितच घडले.
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले/केले गेले तेव्हा 'मी बाहेर राहून पक्षाचे काम करीन' अशी भाषा बोलणारे फडणवीस काही तासातच शपथ घेऊन उपमुख्यमंत्री झाले. कोणी कळ फिरवली आणि का फिरवली हे सर्वांना माहीत आहे.
 
जसे कर्नाटकात भाजपमध्ये बाहेरून आलेले बोम्मई आणले गेले, तसे वेगळ्या प्रकारे महाराष्ट्रात घडले. एका दगडात तीन पक्षी मारण्याचे काम झाले. एकनाथ शिंदे यांना फूस लावून शिवसेना फोडली गेली उद्धव ठाकरे यांना पायउतार केले गेले आणि भाजपमधील उदयोन्मुख नेतृत्व असलेल्या तरुण आणि तडफदार फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवून अवमूल्यन केले गेले.
 
भाजपच्या चाणक्याने आपली स्वतःचीच पाठ थोपटली खरी पण प्रत्यक्षात त्याने 'कर्नाटक मॉडेल' महाराष्ट्रात लागू केले.
 
 
राज्यातील कोणीही महत्वाचे नसते आणि तेथील कारभार कोणीही चालवू शकतो याचे प्रात्यक्षिक मोदी-शहा यांनी आपल्या गृहराज्यात गुजरातमध्ये पहिल्या टर्ममधील आमदारांना मुख्यमंत्री व मंत्री करून दाखवले.
 
या 'गुजरात मॉडेल' चा संदेश 'सबका मालिक एक' असा होता. गुजरातमध्ये भाजपचे प्रस्थापित नेतृत्व एका झटक्यात घरी बसवल्याने महाराष्ट्र्रात वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी सोडली गेली नाही. राज्यात फक्त गाळ असतो असा समज दृढ केला गेला
 
आता अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवल्याने फडणवीस हे नंबर दोनचे उपमुख्यमंत्री का नंबर एकचे यावर देखील बरीच चर्चा सुरु आहे.
 
याचबरोबर राज्य भाजपमध्ये हे सारे अजब आणि चमत्कारिक चालले आहे तरी काय याबाबत कुजबुज सुरु झालेली नाही असे मानणे धारिष्ट्याचे ठरेल.
 
'निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या घालायचा किंवा खुर्च्या ठेवायच्या आणि नेत्याच्या नावाने फक्त जयजयकार करत हातावर हात ठेवून बसायचे काय?', हा प्रश्न भाजप अंतर्गत विचारला जात आहे.
 
राजकारणात येण्यापूर्वी एकेकाळी रिक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या तीन-चाकी वाहनाचे एक चाक फडणवीस आहेत आणि एक अजित. तिघांची दिशा एक असेल तरच रिक्षा पुढे जाईल.
 
नाहीतर प्रवाशाची देखील त्रिस्थळी यात्रा. येथे शिंदे यांचे बरेच साथीदार अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री असताना त्यांनी आमच्या मतदारसंघावर दुजाभाव केला म्हणून ठाकरे यांना सोडून आले.
 
बहुतांशी प्रसारमाध्यमे ही सरकारच्या दबावाखाली असल्याने कर्नाटकमधील खऱ्या परिस्थितीची जाणीव बाहेरच्या जनतेला म्हणावी तशी झाली नाही. त्यांनी 'बजरंग बली' च लावून धरला पण तो सत्ताधाऱ्यांना पावला नाही.
 
'साम दाम दंड भेद' वापरून आपल्या विरोधकांना फोडायचे राजकारण एव्हढ्या राजरोसपणे महाराष्ट्राने पाहिले नव्हते. विरोधी पक्ष म्हणजे धुतल्या तांदळासारखे आहेत असे अजिबात नाही पण त्यांच्यावर सर्वप्रकारे हल्ले करून त्यांना सत्ताधाऱ्यांनी पावन केलेले आहे.
 
काँग्रेसला संधी?
राजकारणात फक्त बेरीज च बघितली जात नाही तर त्यात केमिस्ट्रीचे देखील मोठे काम आहे. जे सारे चाले आहे ते लोकांना आवडते आहे असे मानणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे.
 
महाराष्ट्रात सर्वात दुर्लक्षिलेला पक्ष हा काँग्रेस आहे. त्यात चांगले आणि समंजस नेतृत्व आणून थोडी डागडुजी केली गेली तर तो पक्ष पुढे जाऊ शकतो.
 
शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख असले तरी महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांना एकप्रकारे सर्वात जेष्ठ काँग्रेस नेता म्हणून मानले जाते. अलीकडील काळात राहुल गांधी यांचे नितीश कुमार आणि शरद पवार यांच्याबरोबर फार जवळचे संबंध निर्माण झालेले आहेत.
 
शरद पवारांवरील हल्ला हा काँग्रेसवरील हल्ला/ विरोधी पक्षांच्या युतीवरील हल्ला असे येत्या 17-18 रोजी बंगळुरू मध्ये होणाऱ्या बैठकीत मानले गेले तर महाराष्ट्र कसा निकराने लढवायचा यावर खल होऊ शकतो. तो नवीन राजकारणाला जन्म देणारा असेल.
 
मोदी सरकार हे 9 वर्षे सत्तेत असल्याने त्याला अँटी-इंकंबन्सीचा सामना करावा लागणार आहे.
 
अजित पवारांना महाराष्ट्रातील सरकारमध्ये घेऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारल्याचं काही राजकीय निरीक्षक मानतात.
 
2019 साली अजित पवारांबरोबर औटघटकेचे सरकार बनवून आपण चूक केली होती अशी कबुली नंतर फडणवीस यांनी दिली होती. आता परत त्यांच्याबरोबर घरोबा करून भाजपच्या हाताला हारतुरे लागणार की ढेकळे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.
 
(लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं लेखकांची वैयक्तिक मतं आहेत)