गुरूवार, 1 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (21:40 IST)

तो अपघात नव्हे खूनच! अखेर ‘त्या’ खूनाचे गूढ उलगडले

पुणे एक्सप्रेस हायवेजवळील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मालवाहू टेम्पोला आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२ ऑक्टो.) घडली. मध्यरात्री अचानक भडकलेल्या आगीचा तपास पोलिसांनी सुरू केला असता, अखेर वेगळेच परंतु भयाण असे सत्य बाहेर आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून यातील एक जण अद्याप फरार आहे. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून मिळालेल्या कबूली जबाबातून ही आग जाणीवपूर्वक लावली असल्याचे सांगण्यात आले आहे. हा सारा प्रकार अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असणाऱ्या एका टेम्पोला आग लागली. या आगीची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांसह रेस्क्यू टीम, अग्निशमन दलाच्या टीम तेथे पोहचल्या. मात्र आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने टेम्पोसह चालकाचा त्यात जळून कोळसा झाला.
याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मात्र बळी पडलेल्या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांना अवघड जात होते. दरम्यान, पोलिसांनी टेम्पो मालकाचा शोध घेत टेम्पो चालकाची माहिती मिळवली आणि मृत व्यक्तीची ओळख पटली. सदाशिव संभाजी चिकाळे, (रा. पुनावळे, ता मुळशी, जिल्हा पुणे) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
या जळीतकांड प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांसमोर वेगळेच सत्य बाहेर आले. त्या रात्री संभाजी टेम्पोतून माल घेऊन येत असताना एक कार बऱ्याचवेळेपासून त्यांचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमधून निदर्शनास आले. या आधी संभाजीच्या कुटुंबियांनी एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना हे प्रकरण वेगळे असल्याची खात्री पटली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली
पोलिसांनी संशय व्यक्त केलेल्या व्यक्तीला तात्काळ चौकशीसाठी ताब्यात घ्यायचे ठरविले. मात्र ती व्यक्ती घटनेनंतर गायब होती. पोलिसांनी मोबाईल लोकेेशन ट्रेस करत त्या व्यक्तीला देहू येथून अटक केली. तसेच त्याच्या आणखी एका साथीदारास अटक केली. दरम्यान, आणखी एकाचा समावेश असून तो अद्याप फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आपल्या बायकोचे सदाशिव सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने सदाशिवला संपवण्याचे ठरविले. यादरम्यान त्याने सदाशिववर पाळत ठेवली होती. मंगळवारी कळंबोली येथून आरोपीने सदाशिवचा त्याच्या साथीदारांच्या साहाय्याने पाठलाग केला आणि त्याला रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाठले.
दरम्यान, सदाशिवला तीघांनी बेदम मारहाण करत बेशुद्ध केले. त्याला टेम्पोत बसवून टेम्पोलाच आग लावून दिली आणि ते पसार झाले. या आगीत सदाशिवचा दुर्देवी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिस आणखी शोध घेत आहेत.