शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (20:53 IST)

अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते : विनायक राऊत

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार मंगळवारी कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे. मात्र यावेळी कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
“पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरुन जे आहे ते पोलीस करत आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे,” अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
 
“निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असते मला त्यावर काही बालायचे नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील. आत्ता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहिती पडलं देशातला कायदा नेमका काय आहे तो. यापूर्वी नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये मारा, ठोका आणि पळून जा अशा पद्धतीने सुरु होते. यामुळे कायद्याचे हात किती लांब पर्यंत जावू शकतो हे आता सिद्ध झाले आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.