बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (09:39 IST)

करुणा शर्मा एकट्या लढत आहेत, भाजप त्यांच्या पाठीशी आहे : चंद्रकांत पाटील

अ‌ॅट्रॉसिटीचा एवढा दुरूपयोग कधीही पाहिली नव्हता. भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी आहे. त्यांना न्यायालयात साथ देणे आणि त्यांच्यासाठी आंदोलन करण्याबाबत भाजप विचार करेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय..
 
सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांना रविवारी (5 सप्टेंबर) बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती. करुणा शर्मा यांनी अटकेनंतर "धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप केला.
 
"करुणा शर्मा परळी येथे गेल्यानंतर त्यांना गुन्ह्यात गोवण्यात आलं. त्यांच्या बनावट आवाजात क्लिप तयार करून व्हायरल करण्यात आली. त्यांच्या गाडीत एक महिला पिस्तूल ठेवत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या गाडीच्या चालकावरही अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ॲट्रॉसिटी कायद्याचा इतका दुरुपयोग कधी पाहिला नव्हता. करुणा शर्मा एकट्या लढत आहेत. अशा स्थितीत भाजप करुणा शर्मा यांच्या पाठीशी राहील," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
दरम्यान, बीड पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या करुणा शर्मा यांच्या सांताक्रूझ येथील घरी बीड पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. करुणा शर्मा यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आलीये.