बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (09:01 IST)

सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राचा विक्रम

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र राज्याने बुधवारी (दि.८) रात्री आठ वाजेपर्यंत तब्बल १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस दिली. त्यामुळे राज्यात आजवर एकूण ६ कोटी ५५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख लोकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने विक्रम केला.
 
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली. राज्यात लसीकरण मोहिमेंतर्गत आजवर दिलेल्या एकूण डोसची संख्या साडेसहा कोटींवर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
 
राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती लाभली असून, आरोग्य विभागाची यंत्रणा या मोहीमेच्या यशस्वीतेसाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. त्यातूनच लसीकरणाचे नवनवे विक्रम स्थापन होत आहेत. २१ ऑगस्टला राज्यात एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६५, तर ४ सप्टेंबरला १२ लाख २७ हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले होते. त्यानंतर १२ लाख लोकांच्या लसीकरणाचा स्वतःचाच विक्रम मोडत महाराष्ट्राने बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १४ लाख ३९ हजार ८०९ लस दिल्या. आरोग्य विभागाच्या यंत्रणेने लसीकरण मोहीमेतील आजपर्यंतचे सर्वाधिक लसीकरणाचे उद्दीष्ट्य साध्य केले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.