मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (15:54 IST)

कसाबला पकडलेल्या पोलिसांची बढती; २००८ पासूनचे मिळणार लाभ

२६/११ च्या मुंबई हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब याला पकडण्यात सक्रिय भूमिका बजावलेल्या पोलिसांना बढती देण्यात आली आहे. ही बढती २००८ पासून लागू केल्याचे मानले जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे..ते म्हणाले की, २२ मार्चच्या शासन आदेशानुसार या शूर पोलिसांना पदके, पारितोषिके आणि रोख पारितोषिके देण्यात आली होती, परंतु पदोन्नतीच्या स्वरूपात कोणतेही पारितोषिक देण्यात आले नाही, त्यामुळे त्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, कसाबला पकडणाऱ्या टीममध्ये कॉन्स्टेबलपासून इन्स्पेक्टरपर्यंत १५ पोलिस होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी या हल्ल्यात स्वतःला झोकून दिले होते. पोलिसांच्या या कर्तृत्वाचे जगभरातून कौतुक झाले होते व अजूनही कौतुक होत असते.
 
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. लष्कर-ए-तैयबाच्या दहा प्रशिक्षित आणि प्रचंड शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले. हा हल्ला सुमारे चार दिवस चालला. यामध्ये १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी मुंबईतील दोन पंचतारांकित हॉटेल, एक रुग्णालय, रेल्वे स्थानकांना लक्ष्य केले होते. एवढा मोठा हल्ला झाल्याची सुरुवातीला कोणालाच कल्पना नव्हती. हळूहळू या हल्ल्याच्या प्रमाणाचा अंदाज येऊ लागला आणि देशात वातावरण गंभीर बनले होते.२६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या या हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात सहभागी असलेला अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेला. त्याला नंतर फाशी देण्यात आली