कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा आज निकाल
कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा निकाल शनिवारी अर्थात आज लागण्याची शक्यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता निकालाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तिन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सलग तीन दिवस अंतिम युक्तिवाद केला. जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असूनही खटल्याचं कामकाज पार पडलं. तीन दिवसीय युक्तिवादात निकम यांनी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमेने कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला.
यावेळी 24 परिस्थितीजन्य पुरावे सादर केले. घटनेपूर्वी दोन दिवस आधी तिघांनी छेडून काम दाखवण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पिडीतेवर कटकारस्थान करुन अत्याचार आणि हत्या केल्याचा युक्तिवाद केला. त्याचबरोबर बचाव पक्षाच्या साक्षीदाराचे व्हिडीओ सीडी बनावट असल्याचा युक्तिवाद केला. तर आरोपींच्या वकिलांनी पंचनाम्यातील त्रुटी, साक्षीदारांचा विसंगतपणा, पुरावे आणि नकाशावर आक्षेप घेतला. अंतिम युक्तिवादाचा ऑडिओ रेकॉर्डिंग ही करण्यात आलं आहे.
दरम्यान कोपर्डीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अधिकार्यांसह तब्बल 500 पोलिसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर वेळप्रसंगी एक हजार पोलिस तैनात करण्याचं नियोजन आहे. त्याचबरोबर शिघ्र कृती दल, एफआरपीसह अनेक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोर्टाच्या परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत. तसंच सीसीटीव्ही कॅमेर्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.