दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने खूप त्रास दिला- आ. एकनाथ खडसे
आ. एकनाथ खडसे यांचे एकेकाळी भाजपच्या मोठ्या नेत्यांमध्ये नाव होते. पण, मध्यंतरी ते भाजपपासून दूरावले गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना तिकीट देण्यात आले नव्हते. त्यानंतर त्यांनी पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते भाजपवर सातत्याने टीका करतात. आता त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
भाजपने ओबीसींना त्रास दिला
प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, 'दिवंगत गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपाने खूप त्रास दिला आणि तसाच त्रास आता पंकजा मुंडे यांनाही दिला जातोय. भाजपने नेहमीच ओबीसींना त्रास दिलाय. आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांसारख्या अनेक नेत्यांचा पक्षाने अनेकदा अपमान केला आहे. त्यानंतर माझ्यावर आणि आता पंकजा मुंडेंवरही पक्षातील काही नेत्यांकडून अन्याय झाला आहे.'
मुंडे साहेबांवर अन्याय
ते पुढे म्हणाले की, 'गोपीनाथ मुंडे आणि मी तीन दशकाहून अधिकाळ पक्षासाठी काम केले. त्यावेळी वाणी-ब्राह्मणांचा पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. आम्ही ती ओळख पुसली आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून भाजपला ओळख मिळवून दिली. पण, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी मुंडे साहेबांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यावेळी मी स्वत: त्यांच्याबरोबर हजर होतो. मधल्या काळात त्यांची इतकी छळवणूक झाली की, त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचारही आला होता,' असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor