1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 15 एप्रिल 2024 (09:09 IST)

राम नवमीच्या निमित्ताने आयसीएआय आयोजित व्याख्यानरामायण हा भारताचा खराखुरा इतिहास : अतुलशास्त्री तरटे

Ramayana
रामायण हे कितीही प्राचीन असले तरी आजच्या काळातही त्यातून शिकण्यासारखी अनेक जीवन मूल्ये असून नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. आतापर्यत सुमारे २२० पेक्षा अधिक रामायणे विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असून एकट्या संस्कृत भाषेत ९३ रामायणे आहेत. त्यापैकी  वाल्मिकी रामायण हे सर्वात प्राचीन आणि प्रामाणिक रामायण मानले जाते. कारण महर्षी वाल्मिकी रामायण काळात प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे रामायण हा भारताचा खराखुरा इतिहास आहे असे प्रतिपादन प्राचार्य अतुलशास्त्री तरटे यांनी केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) नाशिक शाखेच्या वतीने राम नवमी च्या निमित्ताने आयोजित ‘रामायण आणि नैतिक मूल्य या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.
 
संस्थेच्या सभागृहात पार पडलेल्या या व्याख्यानाच्या सुरुवातीला आयसीएआयच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए संजीवन तांबुलवाडीकर यांनी आचार्यांना सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले. तर सचिव सीए अभिजीत मोदी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले.
 
व्याख्यानात तरटे म्हणाले की, श्रीरामाच्या जीवनातून अनेक गोष्टी सर्वांनाच शिकण्यासारख्या आहेत, कोणत्याही काळात जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी श्रीरामांनी आपल्या आचरणातून दर्शवलेला मार्ग सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. जीवनात प्रत्येकाने रामांकडून सकारात्मकता शिकली पाहिजे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील संकटांना संधी मानून मार्गक्रमण करण्याचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच हवा. प्रभू श्रीराम यांचा प्रवास हा सामान्य राजपुत्र ते राष्ट्रपुरुष असा झाला.
 
पुढे म्हणाले की, रामायणातील अनेक जीवनमूल्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रासंगिक आहेत. नोकरी व्यवसायात करिअर करतांना रामांकडून सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, सचोटी व मेहेनत तरुणांनी शिकली पाहिजे. आपल्या सहकारी कर्मचाऱ्याना बरोबर घेऊन काम करताना , संघशक्तीचे महत्व श्रीराम शिकवितात. सामान्य माणसाकडून असामान्य कार्य करवून घेता येते, हे अंगद,नळ,नील यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते.  
 
व्यवस्थापन शास्त्राचे अनेक पाठ सहजच रामायणात प्राप्त होतात. उपजीविकेसाठी अनेक अभ्यासक्रम असू शकतात पण रामायण हा जीवन जगण्याचा अभ्यासक्रम आहे प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श मित्र,
आदर्श पति, आदर्श पिता, आदर्श राजा, कुशल राजनीतिज्ञ, अजय योद्धा होते असे तरटे यांनी सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor