शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (16:24 IST)

मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसेचे अमित शाह यांना पत्र

amit shah
मशिदींवरच्या भोंग्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. त्यांनी हे भोंगे हटविण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. राज्यात भोंग्यांविरोधात ठाम भूमिका घेतल्यानंतर मनसेने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये राज्य सरकारला हे भोंगे हटवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने 18 जुलै 2005 च्या जनहित याचिकेवरील निकालात मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरात करण्यात येत असलेल्या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत असून प्रत्येक भारतीयास घटनेने कलम 21 अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन होत नाही. त्यामुळे मनसेने हे भोंगे हटविण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली आहे. राज्य सरकारला हे भोंगे हटविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर राज्यभर राजकीय वातावरण तापू लागलं असून, राज्य सरकारने या प्रकाराला विरोध केला आहे. त्यामुळे मनसेने थेट अमित शाह यांनाच साकडं घातलं आहे. मनसेच्या नाशिक विभागाकडून हे पत्र अमित शाह यांना पाठवण्यात आलं आहे.
 
यामध्ये राज्यातील गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरवण्यात येणार नसल्याचं वक्तव्य करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे.