गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 एप्रिल 2021 (16:09 IST)

राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता

लसींचे डोस अपुरे असल्यामुळे आणि नव्या डोसचा पुरवठा देखील पुरेसा नसल्यामुळे १ मे पासून राज्यात १८ ते ४४ वयोगटामध्ये लसीकरण सुरू करता येणार नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोनच दिवसांपूर्वी जाहीर केलं आहे. मात्र, आता राजेश टोपे यांनी १ मे पासून म्हणजेच शनिवारपासून राज्यात प्राथमिक स्तरावर लसीकरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भातले सूतोवाच केले आहेत. 
 
“१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अगदी प्राथमिक स्वरूपात निवडक लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातल्या काही नागरिकांना लस देता येऊ शकेल. पण नोंदणी करून ज्यांना लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळेल, त्यांनीच संबंधित केंद्रावर जायला हवं. सुरुवातीला जिल्ह्यात एखादं केंद्र असू शकेल. त्यामुळे ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जावं. लस अतिशय नाममात्र स्वरूपात आहे”, असं राजेश टोपेंनी नमूद केलं.
 
“आम्ही सिरमला पत्र लिहिले होते. त्यांनी सांगितलं मे महिन्यात १३ ते १४ लाख लसीचे डोस देऊ. भारत बायोटेक कोवॅक्सिनचे ४ ते साडेचार लाख डोस देऊ शकेल. दोघांची बेरीज १८ लाखांपर्यंत जाईल. त्यादृष्टीने १८ ते ४४ वयोगटासाठी कमी केंद्रांवर लसीकरण सुरू करू शकलो, तर ते करता येऊ शकेल. पण एक नक्की आहे की केंद्र खूप कमी ठेवले, तर जास्त कालावधीसाठी लसीकरण सुरू राहील”, असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.