मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:30 IST)

भरवस फाट्यावर 80 लाखांचा मद्यसाठा ट्रकसह जप्त

State Excise Department
गोवा, दीव, दमण राज्यांत निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे, अशी गुप्त खबर मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने भरवस फाटा, ता. निफाड येथे नाकाबंदी करून पकडलेल्या ट्रकमध्ये तब्बल 80 लाख 70 हजार 520 रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला.
 
उत्पादन शुल्क खात्याने आयशर कंपनीचा सहाचाकी पॅकबंद बॉडीचा कंटेनर क्रमांक एमएच 04 आरबी 4868 हा कंटेनर व त्यातील 501 बॉक्समधील 17 हजार 232 मद्याच्या बाटल्या सह चालक रमजान खान सलमानखान (वय 27, रा. नसीरपूर, राणीगंज, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेतले आहे.
 
विदेशी दारूची वाहतूक होणार असल्याचे समजताच उत्पादन शुल्क खात्याने येवला व विंचूर शहर परिसरात संशयित वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात भरवस फाट्याजवळ हा आयशर ट्रक सापडला. येवला येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाक्‌‍चौरे, प्रवीण मंडलिक, सहाय्यक निरीक्षक अवधूत पाटील, कॉन्स्टेबल संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी व मुकेश निंबेकर यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय वाक्‌‍चौरे हे करीत आहेत.
 
या यशाबद्दल नाशिक विभागाचे उपायुक्त बा. ह. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ए. एस. तांबारे व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor