उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला, परभणी पारा ५.६ अंश सेल्सियसवर
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र गारठला आहे. विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. परभणीतील तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सियस पर्यंत खाली आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.
सध्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. पुढील दोन दिवस या ठिकाणी थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा शुन्याच्या खाली घसरला आहे. दिल्लीतील तापमान ३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बर्फाच्छादित पश्चिम हिमालयीन क्षेत्रातून थंड वारे वाहात आहे. यामुळे थंडीची लाट पसरली आहे.
२० डिसेंबर रोजी हवामान विभागाने नोंदविलेले तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (कुलाबा) २१.८, रत्नागिरी २२.४, पणजी (गोवा) २०.३, जळगाव १२, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १२.१, नाशिक १२.२, सांगली १६.५, सोलापूर १५.५, औरंगाबाद १२.४, अकोला १२.६, बुलढाणा १३.८, गोंदिया ७.४.