गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (21:28 IST)

महाराष्ट्र लॉकडाऊन: ब्रेक द चेनची नवीन नियमावली जाहीर हे आहेत नवीन नियम

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिधुगुर्ग, बीड, नगर, रायगड आणि पालघरमध्ये लेव्हल तीनचे निर्बंध कायम रहाणार. इतर जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं आठ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.
 
याआधी, रुग्ण वाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवतो आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेतला नाही असंही ते म्हणाले होते.
शनिवारी दुकानं दुपारी तीन वाजेपर्यंत उघडी राहतील तसेच गार्डन आणि प्ले ग्राउंड व्यायामासाठी उघडणार आहेत. चित्रपट थिएटर्स बंद राहतील असे सांगण्यात आले आहे.
 
काय आहेत नियम?
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना नियमावलीत सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत नसल्याने तिथे कठोर निर्बंध लागू असतील.
 
कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमावली (लेव्हल थ्री) लागू असेल.
 
इतर जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं आठ वाजेपर्यंत उघडी राहतील.
 
शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शनिवारी दुकानं दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं उघडी राहू शकतील.
गार्डन आणि मैदानं व्यायामासाठी खुली असतील. चित्रपटगृहं मात्र बंदच राहतील.
मुंबई, मुंबई उपनगरं आणि ठाणेमध्येही सध्या तरी निर्बंध लागू राहतील. त्यासंदर्भातला निर्णय स्थानिक आपात्कालीन यंत्रणा प्रशासन घेईल.
सरकारी आणि खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळी विभागण्याची सूचना करण्यात आली आहे.
शेतीविषयक कामकाज, सिव्हिल वर्क, औद्योगिक काम, मालवाहतूक यांचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू राहील.
जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे वातानुकूलित यंत्रणेविना 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री आठवाजेपर्यंत सुरू राहू शकतात. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या सगळ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
चित्रपटगृहं, नाटयगृहं, मल्टीप्लेक्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील.
हॉटेलं 50 टक्के क्षमतेसह दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहू शकतात. पार्सल आणि टेकअवे यांना परवानगी असेल.
रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत जाण्यायेण्यावर निर्बंध असतील.
गर्दी टाळण्यासाठी वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूकसंदर्भातील रॅली, आंदोलन मोर्चे यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
मास्क परिधान करणं अनिवार्य असेल.
सांगली दौऱ्यावेळीच दिली होती मुख्यमंत्र्यांनी माहिती
सांगलीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, "रुग्णवाढ कमी होत नाही अशा जिल्ह्यात दुकानांच्या वेळेवर बंधनं कामय राहतील. पण, इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा 8 वाजेपर्यंत वाढवत आहोत."
 
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात असल्याने, निर्बंध शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून वारंवार केली जात होती.
 
सरकारने यावर ठोस निर्णय न घेतल्याने पुण्यातील नाराज व्यापाऱ्यांनी बुधवारपासून दुकानं संध्याकाळपर्यंत खुली ठेवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता.
 
सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची विनंती करतो आहे. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करा उद्योगांना शक्य आहे तिथे बायो बबल करणे, व आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिड टास्क फोर्सची बैठक 29 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
जुलै महिन्यात लागू लॉकडाऊनुसार सोमवार ते शुक्रवारपर्यंत केवळ दुपारी 4 वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. या वेळेत वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.
 
निर्बंध शिथिल करण्याचा सरकारचा होता विचार
कोरोना संसर्ग रुग्णवाढीचा दर कमी असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय कोव्हिड टास्कफोर्सच्या बैठकीत घेण्यात आला होता.
 
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचा सरासरी पॉझिटिव्हिटी दर, राज्यापेक्षा कमी आहे. त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
 
गुरूवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, "राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर, राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असल्याने, त्या ठिकाणी संपूर्ण निर्बंध शिथिल करण्यात येतील."
 
पण, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठाड्याच्या 11 जिल्ह्यात कोरोनासंसर्गाची परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे.
 
राज्यात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, आणि उत्तर-महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये रुग्णवाढीचा दर, राज्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे, या जिल्ह्यांमध्ये लेव्हल-3 चे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले होते.
 
राज्यातील निर्बंधाबाबत सोमवारी पत्रकारांशी बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, "जानेवारीमध्ये जितक्या केसेस कमी होत्या, तेवढ्या अजूनही झालेल्या नाहीत. लसीकरण लवकरात-लवकर होणं महत्त्वाचं आहे. आम्ही काळजीपूर्वक पावलं उचलत आहोत."
 
आदेश आज आला नाही तर आंदोलन करू
सरकारकडून निर्बंध हटवण्याबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला होता.
 
कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येऊनही, सरकार निर्बंध कमी करत नसल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून दुकानं संध्याकाळपर्यंत उघडी ठेवण्याचा इशारा दिला होता.
 
याबाबत बीबीसीशी बोलताना मुंबईतील रिटेल दुकानांच्या वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी, सरकारने आदेश अजूनही काढलेला नाही. सोमवारी संध्याकाळपर्यंत सरकारने जाहीर आदेश काढला नाही, तर आम्ही आंदोलन करू."
 
दुसरीकडे पुण्यातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सरकारविरोधात घंटनाद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
 
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर बोलताना पुणे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले, "राज्य सरकारने दुकानं संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली तर त्याचं आम्ही स्वागत करू. पण, जोपर्यंत आदेश निघत नाही. तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील."
 
दुकानं सुरू ठेवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अटक केली. तरी, चालेल अशी आक्रमक भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
 
आता सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे ही आंदोलनं होण्याची शक्यता आता मावळली आहे.
 
राज्यातली कोरोनाची परिस्थिती
महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाचा दर गेल्याकाही दिवसांपासून नियंत्रणात असल्याचं दिसून येतंय. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, (27 जुलै) रोजी,
 
राज्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 0.11 टक्के
तर, जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 3.8 टक्के आहे
राज्यात गेल्याकाही दिवसात कोरोनाग्रस्तांच्या सरासरीचं प्रमाण 6500 च्या आसपास आहे.
फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट सुरू झाली. अमरावतीतून पसरलेल्या डेल्टा व्हेरियंटमुळे दुसरी लाट झपाट्याने पसरली होती.
 
जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात सरासरी अडीच हजार कोरोनारुग्णांची नोंद होत होती. पण, फेबुवारीपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली आणि राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले होते.