बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:11 IST)

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व; राष्ट्रवादी ११, शिवसेना ७, तर काँग्रेसला २ जागा

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय पाहायला मिळाला. २१ जागांपैकी ११ जागा राष्ट्रवादी काँग्रेस, ७ जागांवर शिवसेना, २ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर भाजप उमेदवार विजयी झालाय. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचाही एकतर्फी विजय झाला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त केलाय. तसंच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खडसे यांनी जोरदार टीका केलीय.
मी ४० वर्षे भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ४० वर्षे माझी अवहेलनाच केली गेली. पुढच्या कालखंडात नगरपालिका आणि जिल्हा परिषद आमच्या ताब्यात येईल. इतक्या वर्षात गिरीश महाजन हे त्यांच्या मतदारसंघात जाऊ शकले नाहीत. नेते होऊ शकले नाहीत. इतकी वर्षे संघर्ष, आंदोलन, भाषणं मी करत होतदो. नाथाभाऊंना कुणीतरी स्पर्धक म्हणून गिरीष महाजनांना मोठं केलं जातंय. आतापर्यंत महाजनांना मीच मदत करत आलो. सरपंच होते तेव्हा पक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदतही मीच करत आलो. पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
महाजनांमध्ये निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती
जिल्हा बँकेच्या विजयाबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मागील सहा वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक क वर्गात होती. आता ती अ व्रगात आली. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित म्हणून निवडणुकीत विजय झाला. गिरीश महाजन यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती. म्हणून त्यांनी पळ काढला. कदाचित अपयश येईल, याची जाणीव त्यांना झाली होती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.